मुंबई : कफ परेड येथे मद्यधुंद तरूणाने मंगळवारी बेस्ट बसची तोडफोड केली. तसेच बसची तोडफोड करण्यास अटकाव करणारा बसचालक आणि पोलीस शिपायाला आरोपीने मारहाण केली.  बसची तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला कफ परेड पोलिसांनी अटक केली. यापूर्वी अंमलीपदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कफ परेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विनायक जयकर (४०) परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी आसिफ हमीद शेखने आंबेडकर नगर येथून सीएसटीकडे जाणाऱ्या बेस्ट बसची पुढील काच व वायपर तोडल्याचे जयकर यांच्या निदर्शनास आले. आरोपीने बस अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्याला जाब विचारणारे बसचालक हेमंत कदम यांनाही आसिफने मारहाण केली. हा प्रकार पाहून जयकर तेथे गेले. त्यावेळी आरोपी त्यांच्याही अंगावर धावून गेला. तसेच आरोपीने त्यांना मारहाण केली. आरोपीने जयकर यांचा गणवेशही फाडला. या प्रकारानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी आसिफला अटक केली. यापूर्वी अंमलीपदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी आसिफला अटक करण्यात आली होती. घटनेनंतर बेस्ट कर्मचारी कदम व पोलीस शिपाई जयकर यांच्यावर जी.टी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk youth best bus beat up bus driver and police mumbai print news ysh