५००पेक्षा अधिक जनावरांसाठी दुसरी छावणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुष्काळी भागात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली असून एकाच छावणीत अधिक जनावरे ठेवल्याने निर्माण होणारी पाण्याची समस्या लक्षात घेऊन चारा छावण्यांच्या निकषात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. त्यानुसार एका छावणीत तीन हजार जनावरे ठेवण्याची अट रद्द करण्यात आली असून आता ५०० पेक्षा अधिक जनावरांसाठी त्याच गावात दुसरी छावणी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जलस्रोत आटू लागल्याने अनेक गावांत पाण्याची टंचाई भासू लागली असून आजमितीस राज्यातील १५१ तालुक्यांत तसेच काही मंडळात दुष्काळ जाहीर करून सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र हिवाळा कमी होऊन तापमानात वाढ होऊ लागताच ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच चारा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे छावण्यांकडे येणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे एका छावणीमधील जनावरांची संख्या ५०० वरून तीन हजार पर्यंत वाढवण्याचा निर्णय गेल्याच आठवडय़ात सरकारने घेतला होता. मात्र एका छावणीत तीन हजार जनावरांची व्यवस्था करणे, त्यांना पाणी उपलब्ध करून देणे अशक्य असल्याचे अनेक जिल्हा प्रशासनांनी तसेच आमदारांनीही सरकारच्या निदर्शनास आणल्यानंतर एका छावणीत तीन हजार जनावरांची अट रद्द करण्याचा निर्णय आज मदत आणि पुनर्वसन विभागाने घेतला.

त्यानुसार आता एका गावात ५०० पेक्षा अधिक जनावरे छावणीत आल्यास दुसरी छावणी सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात सध्या २८ छावण्या कार्यरत आहेत, यामध्ये सुमारे चौदा हजार जनावरे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to water scarcity changes in fodder capsules