मुंबईत पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजूस १० मीटर रुंदीच्या उन्नत सेवा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल ५० कोटी ६ लाख ५१ हजार रुपये खर्च करणार आहे. चेंबूर भक्ती पार्क ते जिजामाता चौक या दरम्यान हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील रस्त्यांवरुन रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना विना अडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा- शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही! ; ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

भुयारी मार्गाची ऊंची कमी असल्यामुळे निर्णय

भक्ती पार्क वसाहत ते जिजामाता चौक या दरम्यान पूर्व मुक्त मार्गाची रुंदी ६० मी ऐवजी ४० मी एवढी आहे. तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण वसाहत ते भक्ती पार्क वसाहत याना जोडणाऱ्या भुयारी मार्गाची ऊंची कमी आहे. आणीबाणीच्या प्रसंगात रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना भुयारी मार्गामधून जाणे शक्य नाही. त्यामुळे २०३४ च्या विकास नियोजन नियमावलीनुसार याठिकाणी १० मीटर रुंदीचा उन्नत सेवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा- लम्पीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राण्यांचा बाजार, प्रदर्शनावर बंदी

रस्ते कामाला प्रशासकीय मंजुरी

या प्रस्तावित सेवा रस्त्यांमुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरण व भक्ती पार्क वसाहत या दोन्ही वसाहतींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या सेवा रस्त्याचे आराखडे, निविदा व संरचना तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रस्तावित रस्ते कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.