मुंबई – सायबर भामट्यांपासून सावध राहा, फसवणूक कशी टाळा, कमी वेळात मोठ्या लाभाचा मोह बाळगू नका अशी जागृती बँका सातत्याने करत असतात. मात्र एक बँक कर्मचारीच घरबसल्या अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकला आहे. दोन दिवसांत कर्मचाऱयाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली.
फिर्यादी ३४ वर्षांचा असून वांद्रे पूर्व येथील एका बहुराष्ट्रीय बॅंकेत काम करतो. त्याला ३० जून रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. त्या व्यक्तीने फिर्यादीला घरबसल्या पैसे कमावण्याचा प्रस्ताव दिला. केवळ आमची लिंक उघडून लाईक करा आणि त्याचे स्क्रीन शॉट पाठवा असा हा प्रस्ताव होता. प्रत्येक लाईकमागे ५० रुपये दिले जातील, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. हे काम सोपे आहे आणि यात काही फसवणूक होणार नाही, असे फिर्यादीला वाटले आणि त्याने काम स्विकारले.
अशी झाली फसवणूक
तक्रारदाराने लिंक ओपन करण्याचे काम स्विकारल्यानंतर त्याला टेलीग्राम या समाज माध्यमावरील गटात सामावून घेण्यात आले. सायबर भामट्याने फिर्यादीला काही लिंक्स पाठवल्या. त्यात रेस्टॉरंट आणि प्रसिध्द स्थळांची नावे होती. तक्रारदाराने त्या लिंकला लाईक केले आणि त्याचा स्क्रीन शॉट काढून पाठवला. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यात अडीच हजार रुपये पाठविण्यात आले. त्यामुळे तक्रारदार बँक कर्मचाऱयाचा विश्वास बसला. मात्र पुढील काम पूर्ण करण्यासाठी आगाऊ पैसे भरावे लागतील असे तक्रारदाराला सांगण्यात आले.
भरलेले पैसे आणि त्यावर मिळणारा नफा एकत्रित मिळणारा होता. त्यानुसार तक्रारदाराने वेगवेगळ्या बॅंक खात्यात २ लाख ६० हजार रुपये भरले. टेलिग्रामवर तयार करण्यात आलेल्या एका खात्यात फिर्यादी यांनी भरलेले पैसे आणि त्यावर मिळणारा नफा दिसत होता. त्यानंतर फिर्यादी यांनी ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते काढता आले नाहीत. यासंदर्भात तक्रारदाराने संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर तो क्रमांक बंद झाला.
बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
३० जून आणि १ जुलै अशा दोन दिवसात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बँक कर्मचाऱयांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात फसवणुकीच्या ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.