भक्ती परब

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविंद्र नाटय़ मंदिरातील प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचे गेल्या ११ वर्षांपासून अडलेले घोडे आता वेग घेण्याच्या मार्गावर आहे. येथील पाचव्या मजल्यावरील जागा विकसित करून तो रंगमंच प्रायोगिक रंगभूमीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा रंगमंच बांधण्याकरिता ई निविदा मागविण्यात आल्या असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र रंगमंच असावा, अशी मागणी २००७ पासून वेळोवेळी रंगकर्मीकडून करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक नाटय़ पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान  ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच उभारावा, अशी मागणी केली होती. इतर वक्त्यांनीही ही मागणी लावून धरली. याच कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविंद्र नाटय़ मंदिर येथील पाचव्या मजल्यावर रंगमंच उभारणीकरिता प्रयत्न करत आहोत, असे सांगितले.

राज्याच्या सांस्कृतिक विभागाने रंगमंच उभारणीकरिता ई-निविदा मागवल्या असून २१ जूनला त्यावर निर्णय अपेक्षित आहे. पाचव्या मजल्यावरील या रंगमंचाकरिता नेपथ्याचे साहित्य  नेण्याकरिता उद्वाहकाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रविंद्र नाटय़ मंदिरचे प्रकल्प संचालक बिभिषण मारुती चवरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी ई-निविदांबाबत २१ जूनला निर्णय होईल, असे सांगितले.

या निविदांमधून रंगमंच बांधकामाकरिता कंत्राददाराची निवड करण्यात येणार आहे. याला सांस्कृतिक विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. निविदेतील अटीनुसार हा रंगमंच जानेवारी, २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

‘यशवंत’मध्येही जागा

प्रायोगिक रंगभूमीसाठी माटुंग्याच्या यशवंत नाटय़ मंदिरातही एक जागा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले. पण या जागेच्या विकासासाठी कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेणार आहे.

प्रायोगिकला की ‘ड्रामा’ला?

रविंद्र नाटय़ मंदिरची नवी इमारत २००२ला उभी राहिली. त्यानंतरही पाचवा, सहावा आणि सातवा मजला बांधकामाच्या प्रतीक्षेत होता. २००७ मध्ये रंगकर्मीची ‘प्रायोगिक‘साठी रंगमंचाची मागणी तीव्र झाल्यानंतर पाचव्या मजल्यावरील जागा ‘प्रायोगिक‘ला देण्याचा विचार पुढे आला. तेव्हापासून ही जागा चर्चेत आहे. दरम्यान ही जागा महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेला देण्याचाही विचार पुढे आला. त्यामुळे ही जागा बांधून पूर्ण झाल्यावर ‘प्रायोगिक‘साठीच उपलब्ध व्हावी, अशी मागणी रंगकर्मीकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experimental theater built ravindra natya mandir