मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग हलवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली होती. आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच आरे कारशेडसाठी ४०० कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मेट्रो प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये फडणवीस यांनी खर्चासंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरे येथील जंगलांच्या संवर्धनार्थ काम करणारे पर्यावरणवादी झोरु भथेना यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात आरेमध्ये सरकारने ७० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता भथेना यांनी फडणवीस यांना उरलेला ३३० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे.

भथेना यांच्या या खुलाश्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने केलेल्या खर्चासंदर्भातील दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भथेना यांनी पर्यावरवादी स्टॅलिन यांच्यासोबत आरे येथे उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या खर्चाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भात ७० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती या अर्जाला उत्तर देताना दिली आहे. झाडे कापण्यासाठी पाच कोटी, कारशेडसाठी जमीन तयार करण्यासाठी २७ कोटी, ड्रेनेज लाईन आणि पाईप लाईन हटवण्यासाठी दोन कोटी खर्च करण्यात आल्याचे मेटन्रोने म्हटलं आहे.. कारशेडच्या एकूण बांधकामासाठी ३७ कोटी खर्च करण्यात आल्याची माहितीही या उत्तरामधून समोर आली आहे. याच सविस्तर आकडेवारीच्या कागदपत्रांचा फोटो पोस्ट करत पर्यावरण कार्यकर्ते भथेना यांनी उर्वरित ३३० कोटी रुपये कुठे गेले असा सवाल केला आहे.