सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्यामुळे व्यथित होऊन मंत्रालयात विषप्राशन करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे सोमवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरू असताना धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सुजाणपणा दाखवत धर्मा पाटील यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळापूर्वीच नरेंद्र पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाकडे अवयवदान संमतीचा अर्ज दाखल केला.
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर धर्मा पाटील यांचे तीन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. पाटील यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.
कवडीमोलाने जमिनी खरेदी करुन महागड्या दरात विकण्याचा जयकुमार रावल यांचा धंदा: मलिक
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर फडणवीस सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. जो पर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, तसेच जोपर्यंत त्यांना ‘शहीद भूमिपुत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे: सुप्रिया सुळे
दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ, असं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.