कुलदीप घायवट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मध्य रेल्वेचा प्रवास गर्दीमुक्त करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याचा पर्याय मध्य रेल्वेने निवडला आहे. कार्यालयांनी दोन पाळय़ांमध्ये कर्मचारी विभागल्यास गर्दी विभाजित होईल, असा मध्य रेल्वेचा अंदाज आहे. त्यासाठी ३५० संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी मंत्रालय, रुग्णालये, शाळा, बँका आदींमध्ये वेळा बदलण्याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे चित्र आहे.

१ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलल्या. आता अन्य सरकारी, निमसरकारी तसेच खासगी संस्थांनी याचे अनुकरण करावे अशी रेल्वेला अपेक्षा आहे. त्यासाठी विनंती करणारी ३५० पत्रे आतापर्यंत पाठविण्यात आली असून आणखी ४०० संस्थांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.  मात्र यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांची दिनचर्या पूर्णत: बदलेल व त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय या उपायाने लोकलमधील गर्दी खरोखर कमी होईल का, याबाबतही साशंकता आहे. वेळा बदलल्याने मंत्रालयीन कामावर परिणाम होणार नाही. मुख्य सचिवांनी यासंदर्भात बैठक घेतल्यास त्याला पाठिंबा असेल, असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी सांगितले. यामुळे कर्मचाऱ्यांची दिनचर्या बिघडण्याची भीती आहे.  पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असतील, तर मुलांच्या शाळा, वृद्ध आईवडीलांची जबाबदारी सांभाळून नवीन वेळा स्वीकारता येईल का, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मुंबई महानगर पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी म्हटले आहे. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत रेल्वेकडून पत्रव्यवहार झाला नसल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत यांनी सांगितले. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलणे शक्य नाही. मुंबईबाहेरूनही रुग्ण येतात व रांगा लावून राहतात. त्यांना जलद सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना सकाळपासून कार्यरत राहावे लागते. कामाच्या वेळा बदलल्याने, कामावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आधीपासूनच अशा दोन पाळय़ांमध्ये काम करतात. त्यामुळे आता आणखी वेळा बदलणे शक्य नसल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे म्हणाले. 

कार्यालयीन वेळा बदलून गर्दीचा लोंढा खरंच कमी होईल का, असा प्रश्न आहे. रेल्वे प्रशासनाने उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर भर देण्यासह मुंबईच्या पूर्व-पश्चिम रेल्वे मार्ग तयार करणे आवश्यक आहे. रस्ते, मेट्रो व इतर पर्यायी मार्गानी मुंबई पूर्व-पश्चिम दिशांनी जवळ आणली पाहिजे. बॅंकेची कामे वेळेत आणि अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करणे शक्य होणार नाही.  – विश्वास उटगी, अर्थतज्ज्ञ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of changing the routine of employees due to confusion about changing office hours amy