सहा जणांचा मृत्यू, २३ जखमी, दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दक्षिण मुंबईतील ताडदेव- नानाचौक येथील सचिनम हाईट्स या २० मजली इमारतीला शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. २३ जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

‘सचिनम हाईटस’ ही इमारत भाटिया रुग्णालयासमोर आहे. इमारतीच्या १९व्या मजल्यावर सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. काही क्षणातच संपूर्ण इमारतील धुराने वेढले. दुर्घटना घडली तेव्हा रहिवासी झोपेत होते. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट उडाली. अनेक रहिवासी जीवाच्या आकांताने जिन्याने खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. जवानांनी बचावकार्य सुरू केले. परंतु तासाभरात आग आणखी भडकली. त्यामुळे सकाळी पावणे आठ वाजता अग्निशमन दलाने आग भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले. १३ बंबांच्या साहाय्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याची शिकस्त केली. त्यांना दुपारी १२ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली असून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे आग भडकली असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी इमारतीला नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या इमारतीला दोन विंग असून एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये जाण्यास मार्ग उपलब्ध आहेत. मात्र ते बंद ठेवल्यामुळे सहा रहिवाशांना प्राण गमवावा लागल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. 

इमारतीच्या काही भागांमध्ये प्रचंड धूर कोंडून राहिल्यामुळे रहिवाशांना खाली उतरणे कठीण झाले होते. अग्निशमन दलाने बचावकार्य हाती घेतल्यानंतर अडकून पडलेल्या २९ जणांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.

जखमींपैकी सात जणांना नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. भाटिया रुग्णालयात दाखल असलेल्या १७ जणांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे, तर पाच जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तेथे १२ जण उपचार घेत आहेत. मसीना रुग्णालयात एकजण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेनंतर इमारतीतील हृदयरुग्णांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी इमारतीची पाहणी केली. तसेच नायर आणि कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

आग लागली तेव्हा रहिवासी झोपेत होते. इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या मातृमंदीर या इमारतीतील रहिवाशांनी इशारे करून आम्हाला जागे केले आणि अग्निशमन दलाला माहिती दिली, असे रहिवासी समीक्षा खोत यांनी सांगितले. मातृमंदीर इमारतीतील रहिवाशांनीच दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांना आधार आणि आसरा दिला.

इमारतीची संरचनात्मक तपासणी 

आग लागलेल्या इमारतीतील विद्युत वाहिन्यांचे खूप नुकसान झाले आहे. विद्युत वाहिन्यांचे नक्की किती नुकसान झाले आहे, त्याचे परीक्षण केले जाणार आहे. तसेच इमारतीच्या जळालेल्या भागाची संरचनात्मक तपासणी करून मगच रहिवाशांना राहण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

विद्युत वाहिन्या वितळल्या

आग इतकी भीषण होती की इमारतीतील मुख्य विद्युत वाहिन्या वितळून गेल्या. इमारतीमधील एकोणीसाव्या मजल्यावरील एका घरात मोठ्या प्रमाणावर आग भडकली होती. त्याचबरोबर इमारतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या डक्टमध्येही आग पसरली होती. त्यामुळे आग नक्की कुठून सुरू झाली याचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी दिली. डक्टमधील विद्युत वाहिन्या वितळून खाली पडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीतील विद्युत यंत्रणा दुरुस्त होण्यास जास्त कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

नायरमध्ये तिघांवर उपचार

नायरमध्ये सध्या तीन जणांवर उपचार सुरू असून एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या रुग्णाचे नाव मनिष सिंग(३८) असे आहे. अन्य दोघाची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

कुटुंबाचे प्रसंगावधान…

इमारतीच्या १९ व्या मजल्यावर अधिक धूर होता. तेथील १९०४ या सदनिकेमध्ये आग पसरली होती. या सदनिकेच्या शेजारच्या १९०३ क्रमांकाच्या सदनिकेतील रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी घराचे दरवाजे बंद करून खिडक्या उघडल्या आणि ते खिडकीत येऊन मदतीसाठी थांबले. त्यामुळे हे कुटुंब वाचले. अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर त्यांनी त्यांना बाहेर काढले.

मृत : मौसमी मिस्त्री, हितेश मिस्त्री, मंजूबेन कंथारीया, पुरुषोत्तम चोपडेकर. दोन मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

गंभीर जखमी : माधुरी चोपडेकर (कस्तुरबा), धवल, हंसा चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनीषा सावंत, धनपत पंडीत, मनीष सिंग.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire building at taddev caught fire six killed 23 injured akp
First published on: 23-01-2022 at 01:13 IST