मुंबई : जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे शतक पूर्ण केले असताना आता सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये ६० वर्षीय व्यक्तीवर गुडघा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे आता जे.जे रुग्णालयापाठोपाठ सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्येही गरजू रुग्णांवर रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू हाेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१० वर्षांपासून गुडघा दुखीचा त्रास होत असलेली मालाड येथे राहणारी ६० वर्षीय महिला सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये मागील आठवड्यामध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. सतत गुडघा दुखत असल्याने तिचा पाय गुडघ्याखाली तिरका झाला होता. रुग्णाची तपासणी केल्यावर गुडघ्यातील सांध्यात वात झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने गुडघा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी रुग्णालयामधील डॉक्टरांचे रोबोटिक शस्त्रक्रियेचे ज्ञान अधिक सक्षम करण्यासाठी आणलेल्या रोबोटिक यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रोबोटिक शस्त्रक्रियेची सर्व माहिती रुग्ण व तिच्या नातेवाईकांना देऊन डॉक्टरांनी १८ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

गुंतागुंतीची असलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अवघ्या ४० मिनिटांमध्ये सहजरित्या यशस्वीपणे पार पाडली. नियमितपणे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे एक ते सव्वा तास लागतो. रोबोटिक तंत्रज्ञानाने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे प्रत्यारोपित सांधा अचूकपणे बसविण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातील पथकप्रमुख डॉ. अमित सुपे यांनी दिली. रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. अमित सुपे यांच्यासोबत डॉ. नितीन महाजन, डॉ. नावेद अन्सारी, डॉ. पूर्णिमा सोनकांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सेंट जॉर्जेस रुग्णालयात करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. अमित सुपे यांनी सांगितले.

पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यातील सांधा अचूकपणे प्रत्यारोपित केला जातो. त्यातील मानवी चुका टाळण्यात येतात. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी होणे, शस्त्रक्रियेदरम्यानची जखम कमी राहणे, वेगाने बरे होणे आणि प्रत्यारोपण दीर्घकाळ टिकणे यासारखे महत्त्वाचे फायदे होतात. रोबोटिक तंत्रज्ञान वापरून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे आता शक्य झाले आहे.- डॉ. अमित सुपे, पथक प्रमुख, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, सेंट जॉर्जेस रुग्णालय

प्रशिक्षणासाठी आणण्यात आलेल्या रोबोटिक उपकरणामुळे आम्ही यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भविष्यात आम्ही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करून, गरीब रुग्णांना अधिकाधिक फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करू.– डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय