सनातन संस्था किंवा हिंदू जनजागरण समिती अशा संस्थांमध्ये कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉशिंग’ करण्यात येते. याआधी पुरोगामी विचारांच्या समाजसुधारकांची लढाई ही वैचारिक होती. मात्र अशा ब्रेनवॉशिंग केलेल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणेही संभवत नाही. हे कार्यकर्ते फक्त आदेशांचे पालन करत असतात. त्यांना स्वत:चा असा मेंदू, विचारशक्ती नसते. त्यामुळे पुरोगामी विचारवंत, समाजसुधारक यांना यापुढील लढाई माणसांशी नाही, तर अशा यंत्रमानवांशी करायची आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसुधारक श्याम मानव यांनी समाजसुधारकांना दिला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, भाजप आदींचा या खुनाशी काही संबंध असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले आणि त्यांच्या पत्नी कुंदा आठवले हे एकेकाळी आपले चांगले स्नेही होते. त्यांनी त्या काळी आपल्या कार्याला मदतही केली होती. मात्र पुढील काळात ते अत्यंत जहाल बनले. आठवले दाम्पत्य हे संमोहनशास्त्रात पारंगत आहेत.  त्यामुळे ते समूह, व्यक्तींना संमोहित करू शकतात, असे मानव म्हणाले. कोणत्याही कार्यात ही पद्धत भयानक असून समोरच्या व्यक्तीला भ्रमिष्टावस्थेत नेण्यासाठी ही पद्धत अत्यंत परिणामकारक आहे. या पद्धतीमुळे ‘मानवी बॉम्ब’ही तयार होतील, असेही आपण लेखात नमूद केल्याचे मानव म्हणाले.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही हिंदूत्ववादी भूमिका मांडणारे पक्ष जबाबदार असल्याची विधाने काही लोक करत आहेत. मात्र या विधानांमध्ये काहीच तथ्य नाही,अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला याआधीही खूप सहकार्य केले आहे, असे मानव यांनी सांगितले. ‘सनातन’ने ही असहिष्णू भावना थेट वारकरी संप्रदायामध्येही पसरवली आहे. वारकरी संप्रदाय हा तर्कशुद्धपणासाठी ओळखला जातो. मात्र या संप्रदायातील काही मंडळीही या संघटनांच्या मागे लागून टोकाची भूमिका घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.अंधश्रद्धा निर्मूलन कायदा क्रांतिकारी ठरणार असून त्याचा अवलंब योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. हा कायदा व्यवस्थित लागू झाला नाही, तर तो सरकारवर आणि समाजसुधारकांवरच उलटण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.