पश्चिम रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांच्या यादीत असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकात आज, शुक्रवारपासून मोफत ‘वाय-फाय’ सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सेवा टर्मिनससह लोकल स्थानकावरही उपलब्ध होणार आहे. या वाय-फाय सेवेचा डाऊनलोड वेग १ हजार एमबीपीएस असणार असून एका तासानंतर हा वेग कमी होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काही दिवसांपूर्वीच गुगलने भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने देशभरात ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले होते. याच धर्तीवर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा सुरू करून या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे समजते. या वाय-फाय सेवेचा डाऊनलोड वेग एक हजार एमबीपीएस असणार आहे. यामुळे प्रवाशांना कोणतेही एचडी व्हिडीओ विनासायास पाहता येतील आणि अधिक एमबीमध्ये असलेली चित्रफीतही चार मिनिटांत डाऊनलोड होईल, असे सांगण्यात आले. मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्याचा हा उपक्रम आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. सुमारे एक कोटी रेल्वे प्रवाशांना लाभ पुरवण्याचा मानस असल्याचे समजते. ही सेवा मुंबई सेंट्रल टर्मिनसप्रमाणे लोकल स्थानकांवर उपलब्ध होईल. शुक्रवारपासून ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रवाशांना भ्रमणध्वनी क्रमांक रेल्वेकडे नोंदवावा लागणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शेलेंद्र कुमार यांनी सांगितले.