बिअर ऑनलाईन ऑर्डर देणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. ४२० रूपयांच्या तीन बिअर या तरुणीला तब्बल ८७ हजार रुपयांना पडल्या आहेत. पवई परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत ही घटना घडली असून याप्रकरणी तिने पवई पोलिसांत तक्रार दिली आहे.
मुंबईतील पवई परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला बिअर प्यायची इच्छा झाली. तिने होम डिलिव्हरीसाठी गुगलवर परिसरातील वाईन शॉपचा शोध घेतला. यात तिला परिसरातील एका वाईन शॉपचा नंबर मिळाला. तिने नंबर फोन करून तीन बिअर मागवल्या. त्याचे ४२० रुपये बिल झाले होते. त्यानंतर समोरील व्यक्तीने तिचा युपीआय आयडी मागितला आणि तिच्या मोबाईल वॉलेटमधून ४२० रुपये पाठवायला सांगितले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे या तरुणीने ४२० रूपये पाठवले. पण त्यानंतर तिच्या बँक खात्यातून २९ हजार रूपये काढून घेण्यात आले.
सदरील तरूणीने समोरील व्यक्तीला ही माहिती दिली. त्यावर चुकीने पैसे आले असून थोड्या वेळाने परत मिळतील असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर तिला व्यवहाराचा संशय आला. याचवेळी दोन ट्रान्झक्शन होऊन तिच्या खात्यातून ५८ हजार रूपये काढून घेण्यात आले. याप्रकारानंतर तरुणी त्या वॉईन शॉपीवर गेली आणि तिथे हा प्रकार सांगितला. त्यावर तो नंबर आमचा नसल्याचे दुकानदाराने तिला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पवई पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या क्रमांकावरून चोरांचा शोध घेत आहे.