मुंबई: जुन्या वस्तू ऑनलाईन विक्री करणाऱ्यातरुणीला सैन्य दलातील अधिकारी असल्याची बतावणी करून एकाने दीड लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी तरुणीने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फसवणूक झालेली २३ वर्षीय तरुणी विक्रोळी परिसरात वास्तव्यास असून ती एका खासगी कंपनीत काम करते. तिच्याकडे काही जुनी विद्युत उपकरणे होती. या वस्तू तिला विकायच्या होत्या. तिने एका ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या वेबसाईटवर याची जाहिरात दिली. त्यानंतर काही वेळातच संजय कुमार नावाच्या व्यक्तीचा तिला संदेश आला. त्याने या वस्तू विकत घेण्याची इच्छा व्यक्त करून तरुणीकडून तिचा मोबाइल नंबर घेतला. आपण सैन्य दलात अधिकारी असल्याचे सांगून त्याने या तरुणीला बोलण्यात गुंतवले.

त्यानंतर विविध कारण सांगून तिच्याच बँक खात्यातून १ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी तरुणीला आणखी काही पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने तत्काळ याबाबत सायबर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिने विक्रोळी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.