मुंबई : यंदा गणेशोत्सवनिमित्त रस्तेमार्गे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर आहे. राज्य वाहतूक अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महामार्ग पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी इत्यादी यंत्रणांतील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २७ ऑगस्टपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणाना देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे, पालघरमधून मोठय़ा संख्येने नागरिक रस्तेमार्गे कोकणात जातात. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कोकणात जाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. रेल्वे गाडय़ांचे तिकीट उपलब्ध होत नसून एसटी गाडय़ांचेही मोठया प्रमाणात आरक्षण होत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बसने आणि वैयक्तिक वाहन घेऊन कोकणात जाणाऱ्यांचीही संख्या यावेळी अधिक असणार आहे. गणेशोत्सवात कोकणपर्यंतचा रस्तेमार्गे खडतर प्रवास सुकर करण्यासाठी महामार्ग पोलिसांनीही कंबर कसली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे आहेत. यापैकी वाकण पट्टय़ात सर्वाधिक म्हणजे आठ ठिकाणी आणि महाड पट्टय़ात सात ठिकाणी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत, तर पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्टय़ातही मोठया प्रमाणात खड्डे आहेत. या पट्टय़ातून जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पुणे-कोल्हापूर महामार्ग,  खोपोली-वाकण राज्यमार्ग या मार्गाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई-गोवासह अन्य महामार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही खड्डे आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी २७ ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची कामे पूर्ण करावी, असे निर्देश महामार्ग पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

  • परशुराम घाटात २४ तास यंत्रणा : गणेशोत्सवकाळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता परशुराम घाट परिसरातच आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ २४ तास कार्यरत राहणार आहे. पाऊस अद्याप सुरू असून वाहतूक कोंडी, दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने येथील परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

खड्डे कुठे?

  • पळस्पे- रामवाडी ते वाशी नाका, वाशी नाका ते वडखळ बायपास पुलाच्या सुरुवातीपर्यंत, वडखळ गावाजवळून जाणारा मार्ग
  • वाकण- निगडे पूल ते आमटेम गाव, एच. पी. पेट्रोल पंप कोलेटी ते कोलेटी गाव, कामत हॉटेल नागोठणे ते गुलमोहर हॉटेल चिकणी, वाकण फाटापासून सुमारे १०० मीटरपुढे, सुकेळी खिंड, पुई गाव येथील म्हैसदरा पूल, कोलाड रेल्वे ब्रिज ते तिसे गाव, रातवड गाव.
  • महाड- सहील नगर, दासगाव, टोलफाटय़ाच्या अलीकडे, वीर रेल्वे स्थानकासमोर, मुगवली फाटा, एच. पी. पेट्रोलपंप ते नागलवाडी फाटा, राजेवाडी फाटा
  • कशेडी- पोलादपूर सडवली नदी पूल ते खवटी अनुसया हॉटेलपर्यंत, भरणे नाका खेड येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस.
  • चिपळूण- परशुराम घाट, बहादूर शेख नाका ते चिपळूण पॉवर हाऊस, आरवली एसटी स्थानक, संगमेश्वर ते बावनदी

गणेशोत्सवकाळात कोकणात मोठय़ा संख्येने रस्तेमार्गे वाहने जातात. मुंबई-गोवा मार्गावरील प्रवास सुरळीत राहण्यासाठी महामार्ग पोलीस अधीक्षक, तसेच रस्त्यांशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश देतानाच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना २७ ऑगस्टपूर्वी खड्डे बुजवण्याचे आणि अन्य कामे वेळत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे.

 – कुलवंत कुमार सारंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक, महाराष्ट्र राज्य)

More Stories onहायवेHighway
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa highway travel rough pits challenge highway police traffic smooth ysh
First published on: 17-08-2022 at 00:52 IST