मुंबई : गोरेगाव पूर्व येथे भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने रिक्षा आणि दुचाकीला दिलेल्या धडकेत गुरुवारी दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी मोटारगाडी चालकाला अटक करण्यात वनराई पोलिसांना यश आले आहे. आरोपी विद्यार्थी असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोविंदम यादव (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. गोरेगाव येथे गुरूवारी झालेल्या अपघातात  रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> गोरेगावमध्ये एक कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; तरुण अटकेत

हेही वाचा >>> मुंबई: नवजात बालकांची विक्री करणाऱ्या दोन महिला अटकेत

सचिन काकु (४२) व त्याचा मित्र वरूण शेट्टी दोघेही बुधवारी दुचाकीवरून भाईंदरला जात होते. गोरेगाव पूर्व – पश्चिम द्रुतगती मार्गाच्या उत्तर वाहिनीवरून जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणारी मोटारगाडी दुभाजक ओलांडून त्यांच्या मार्गिकेवर आली. या मोटारगाडीने रिक्षा आणि दुजाकीला धडक दिली. त्यावेळी सचिन व शेट्टी दुचाकीवरून खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात रिक्षाचालक व रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला. रिक्षाचालक रोहित पंडित (२३) व प्रवासी जिनाय मोलाकपल्ली अशी मृतांची नावे आहेत. जिनाय मोलाकपल्ली हा कांदिवली येथील रहिवासी असून खासगी कंपनीत काम करीत होते. ते घरी जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मोटारचालकाविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालकाने अपघातानंतर घटनास्थळी गाडी सोडून पळ काढला होता.  याप्रकरणी दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.