मुख्यमंत्री निधीतून २४० कोटी; अर्जाची तात्काळ छाननी करून रुग्णांना दिलासा

सात वर्षांच्या रचनाला कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारासाठी येणारा खर्च करणे तिच्या पालकांना शक्य नव्हते. कोणी तरी मुख्यमंत्री मदतनिधीत अर्ज करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी अर्ज केला आणि दोन लाख रुपयांचा धनादेश तात्काळ हाती पडला. आमच्यासाठी हे सारे स्वप्नवत होते हे रचनाच्या वडिलांचे उद्गार बोलके आहेत. अशीच भावना आज हजारो रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत असून वैद्यकीय मदतीसाठी धन्यवाद देणाऱ्या हजारो पत्रांचा वर्षांव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी होत असतो.

देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीचे मुख्यमंत्रीही रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून आर्थिक मदत देत होते. तथापि ही मदत पाच हजार ते पंधरा हजार रुपये एवढीच देण्यात येत असे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केला. यासाठी त्यांनी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून रुग्णांना तात्काळ मदत मिळण्याची व्यवस्था निर्माण तर केलीच शिवाय रुग्णाच्या आजाराचे स्वरूप व खर्च लक्षात घेऊन एक लाख ते तीन लाख रुपये मदत देण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत सुमारे २६ हजार रुग्णांना मुख्यमंत्री मदत निधीमधून सुमारे २४० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कॅन्सर, हृदयविकार, मूत्रपिंड विकार तसेच मेंदू शस्त्रक्रियेसह विविध गंभीर आजारांवरील उपचारासाठी सढळ हस्ते मदत मिळाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राबविलेल्या रुग्णसेवेच्या अनेक योजनांमध्ये, महसुली विभागांमध्ये कॅन्सर रुग्णालये उभारण्याबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधण्याच्या योजनांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत विभातील उपसचिव प्रशांत मयेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीच्या माध्यमातून २०१५ साली २,३७१ रुग्णांना मदत करण्यात आली तर २०१६ मध्ये ९,६९१ आणि २०१७ मध्ये १३,५८५ रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आल्याचे मयेकर यांनी सांगितले. रुग्णांनी अर्ज केल्यानंतर त्याची तात्काळ छाननी करून त्यांची गरज लक्षात घेऊन मदतीचा धनादेश काढला जातो.

हजारो रुग्णांना या मदतीमुळे जीवनदान मिळत असून कृतज्ञता व्यक्त करणारी हजारो पत्रे येत असतात. एका पत्रात तर राज्याला खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी’ मुख्यमंत्री मिळाल्याचे एका रुग्णाने नमूद केल्याचेही मयेकर म्हणाले. गेल्या वर्षभरात हृयविकाराचे ६५७ रुग्ण, कॅन्सरचे ९८० रुग्ण, मेंदू शस्त्रक्रियेचे २४८ रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे ३२२ रुग्ण तसेच अपघातातील शेकडो रुग्णांना मदत मिळाली आहे.

राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था बळकट करून तेथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने महसुली विभागनिहाय सुपरस्पेशालिटी आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात येईल. त्याचप्रमाणे मधुमेह व रक्तदाब रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री