चारकोप, गोराईमधील म्हाडा वसाहतींबाबत सभापतींची म्हाडाला सूचना
मुंबई : चारकोप, गोराईमधील म्हाडा वसाहती जुन्या झाल्या असून आता वसाहतीतील सोसायटय़ा स्वतंत्र पुनर्विकासासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पुनर्विकासासाठी सोसायटय़ांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. मात्र असा एकेका सोसायटीचा पुनर्विकास न करता संपूर्ण वसाहतीचा समूह पुनर्विकास करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत चारकोप आणि गोराईत म्हाडा वसाहती विकसित करण्यात आल्या आहेत. चारकोपमध्ये म्हाडा वसाहतीतीत ७५०, तर गोराईत २८० बैठय़ा चाळी आहेत. या चाळी जुन्या असून आता काही सोसायटय़ा पुनर्विकासासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार मुंबई मंडळ पुनर्विकासासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देत आहे. आता एकेका चाळीचा, सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे. मात्र असा स्वतंत्र पुनर्विकास झाला तर येथे पायाभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सुविधा अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे या वसाहतींचा समूह पुनर्विकास करावा, अशी सूचना मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मुंबई मंडळाकडे केली आहे. स्वतंत्र ‘ना हरकत’ प्रमाणपत्रास तात्पुरती स्थगिती देत समूह पुनर्विकासाद्वारे संपूर्ण परिसराचा सुनियोजित विकास करावा. समूह पुनर्विकास केला तर भविष्यात येथे रस्ते, बाजार, दवाखाना तसेच इतर सुविधा उपलब्ध होतील आणि याच फायदा रहिवाशांना होईल. त्यामुळे मंडळाने वास्तुविशारदाची नेमणूक करून या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, असे त्यांनी सूचित केले आहे.
चारकोप आणि गोराईतील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाअंतर्गत करावा, अशी सूचना दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनेनुसार यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारला पाठवू. सरकारच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करू.
– योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा