हाजी अली दर्गाबाहेर केलेली अतिक्रमणे तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने हाजी अली दर्गा ट्रस्टला दिले आहेत. या भागातच १७१ स्केअर मीटर क्षेत्रफळ असलेली एक मशीद आहे. तिचा अपवाद वगळता इतर बांधकाम तोडण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  हाजी अली दर्ग्याजवळील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी याचिका एका जणाने टाकली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ८ मेच्या आधी ही सर्व अतिक्रमणे हटविण्यात यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी दर्गा ट्रस्टला पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारकडून कुठलेही आर्थिक सहाय्य या कामी मिळणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.