Harbor railway line to Goregaon will be extended to Borivali mumbai | Loksatta

हार्बरची धाव लवकरच बोरिवलीपर्यंत; भूसंपादन प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर

गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान सात किलोमीटर विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी खर्च ८२५ कोटी ३१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

हार्बरची धाव लवकरच बोरिवलीपर्यंत; भूसंपादन प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर
हार्बरची धाव लवकरच बोरिवलीपर्यंत (संग्रहित छायाचित्र)

गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. हा विस्तार प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून त्यानंतरच प्रवाशांना हार्बर मार्गावरून सीएसएमटीवरून थेट बोरिवलीला जाता येणार आहे.

हेही वाचा- मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार

हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावतात. तर गोरेगाव – पनवेल लोकलही सुरू झाल्या आहेत. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीपर्यंत हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून पुढे पश्चिम रेल्वेने प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च २०१९ पासून गोरेगावपर्यंत लोकल धावू लागल्या. आता हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विस्तारिकरणाचे काम पश्चिम रेल्वे करीत आहे.

हेही वाचा- मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी

या प्रकल्पसाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. प्रकल्पात येणारी झाडे, भूसंपादन यासह विविध सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच मार्गिकेचे संरेखन नियोजन आणि पुलांचे सामान्य रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. तर झाडांचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्याने दिली. अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा- मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा

गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार प्रकल्प

  • गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान सात किलोमीटर विस्तार.
  • प्रकल्पाचा खर्च ८२५ कोटी ३१ लाख रुपये.
  • उपलब्ध जागा लक्षात घेऊन गोरेगाव – बोरिवली हार्बर मार्ग काही ठिकाणी उन्नत (एलिव्हेटेड) करण्याचा विचार.
  • विस्तार होताच २०३१ पर्यंत प्रवासी संख्येत आणखी दोन-तीन लाखांची भर पडेल.
  • विस्तार करताना काही खासगी व रेल्वेच्या बांधकामांवर हातोडा पडणार.
  • सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही उभारण्यात येणार आहे. भविष्यात हार्बरच्या आणखी दोन मार्गिकांची भर पडणार आहे. त्यामुळे बोरिवलीपर्यंत आठ मार्गिका असतील.
  • मुंबई रेल्वे विकास महामंडळाने भविष्यात हार्बर मार्गाचा बोरिवलीपासून विरारपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 14:58 IST
Next Story
मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार