पावसाच्या विलंबाने आणखी पाणीकपातीची भीती निर्माण झाली असतानाच मुंबईत धो धो पाऊस पडला. तलावक्षेत्रातही दमदार पाऊस पडला असून, मंगळवारी एका दिवसात तब्बल ३४ दिवस पुरेल एवढा जलसाठा तलावात वाढला आहे. शहराला पाच महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मोडकसागर तलावही भरण्याची शक्यता आहे. पावसाच्या या कृपेने मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापर्यंत सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडला होता. यावेळी जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तलावातील साठा एक लाख दशलक्ष लिटरहून
शहराला दररोज सुमारे ३७०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज लागते. यानुसार या वाढीव जलसाठय़ामुळे शहराची ३४ दिवसांची गरज पूर्ण होऊ शकेल.
सध्या तलावांतील पाणीसाठा पाच महिन्यांसाठी पुरेसा असून वर्षभराच्या पाणीसाठय़ासाठी साडेतेरा लाख दशलक्ष लिटरची गरज आहे.
मोडकसागर भरण्याची शक्यता
तुळशी तलावानंतर आता मोडकसागर तलाव भरण्याची शक्यता आहे. २४ तासांत तब्बल २१६ मिमी पाऊस पडल्याने मोडकसागर तलावातील पाणीसाठय़ात १७ हजार ७५३ दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाची वाढ झाली. या तलावात सध्या १ लाख ५ हजार दशलक्ष लिटर पाणी असून तलावाची क्षमता १ लाख २९ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. तलावाची उंची १६३.१५मीटर असून मंगळवारी सकाळी पाण्याची पातळी १६०.२२ मीटपर्यंत पोहोचली होती.
ठाण्यात मुसळधार, मुंबईत जोर कमी
मुंबई : टप्प्याटप्प्याने प्रवास करण्याचे वैशिष्टय़ दाखवत मान्सूनने यावेळीही मुंबईसह कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. आठवडाभराच्या तुरळक सरींनंतर आलेल्या पावसाने ठाणे परिसरात मुसळधार वृष्टी केली. मुंबईत तसेच कोकणात इतरत्र मात्र मध्यम स्वरुपाच्या सरी आल्या. ४८ तासांत मुंबईत मध्यम स्वरुपाच्या सरी येणार असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून कोकण परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.