एकमेकांविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्ये करून कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोटीस बजावली.
‘राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दोन्ही नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्ये करून कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. तसेच त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करून घेण्याचीही मागणी केली आहे.
न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने पवार आणि ठाकरे अशा दोघांसह राज्य सरकारलाही नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
सार्वजनिक सभांच्या माध्यमातून दोन्ही नेते एकमेकांवर चिखलफेक करीत होते. दोघांनीही चिथावणीखोर वक्तव्ये केली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि हिंसाचार होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राज ठाकरे यांनी तर आपल्या भाषणांमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कृषीमंत्री शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली, असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.