मुंबई : कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाचे, स्थानकातील प्रवेशद्वाराचे छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. त्यानुसार या स्थानकातील प्रवेशद्वारावर छप्परच नसल्याने अनेकांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसी) टीका केली आहे. प्रवेशद्वाराला छप्पर का नाही, छप्पर नसल्याने आत जाणारे पावसाचे पाणी कसे रोखणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे इथे सरकता जिना असून तो पावसात कसा चालणार, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. तर विनाछप्पर प्रवेशद्वाराबाबत अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.
एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम करण्यात आले आहे. तर या मार्गिकेचे संचलनही एमएमआरसीकडूनच करण्यात येते. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. शेवटच्या अर्थात आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्प्याच्या संचलनाची प्रतीक्षा येत्या काही दिवसातच संपणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
एमएमआरसीने एक्स (ट्विट) माध्यमातून शेवटच्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या स्थानकाच्या छायाचित्रावरून आता एमएमआरसीवर टीका होऊ लागली आहे.
या मेट्रो स्थानकातील एका प्रवेशद्वाराला छप्पर नसल्याने मुंबईकर आश्चर्यचकीत झाले आहेत. या प्रवेशद्वाराअंतर्गत एका बाजूला जिना असून दुसऱ्या बाजूला सरकता जिना आहे. मात्र त्यावर छप्पर नसल्याने पावसाचे पाणी कसे रोखणार, पावसात सरकता जिना कसा चालणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर एमएमआरसी छप्पर बांधायला विसरली का, अशीही टीका एमएमआरसीवर केली जात आहे.
याविषयी एमएमआरसीकडे विचारणा केली असता महाराष्ट्र हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटीच्या (एमएचसीसी) सूचनांचे पालन करत सौंदर्यात्मक दृष्टीकोन लक्षात घेऊन हुतात्मा चौक स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गम संरचना छप्पराशिवाय डिझाइन करण्यात आल्याचे सांगितले. तर पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ड्रेनेज प्रणाली, पंप बसविण्यात आला असून येथे सतत देखरेख ठेवली जाणार आहे, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, काही देशात छप्पर नसलेले प्रवेशद्वार आहे. मात्र तिथल्या पावसात आणि मुंबईच्या पावसात खूप फरक आहे. त्यातही सरकते जिने असे विनाछप्परचे पाहण्यात नाहीत. त्यामुळे हे डिझाइन कसे आणि का तयार करण्यात आले हा मोठा प्रश्न असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी सांगितले. या प्रवेशद्वाराला शटर नसल्याने रात्री प्रवेशद्वार बंद कसे करणार, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या स्थानकातील सर्व प्रवेशद्वारावर उद््वाहन असून एकाच प्रवेशद्वारावर जिना आणि सरकता जिना आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करत बाथेना यांनी या प्रवेशद्वाराच्या रचनेवर टीका केली.