मुंबई : भारतीय रुग्णांसाठी खास तयार केलेल्या कॅन्सर उपचार संशोधनात आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी मोठी झेप घेतली आहे. संस्थेने देशातील पहिली ‘कॅन्सर टिश्यू बँक’ उभारली असून तिच्या मदतीने डॉक्टर व वैज्ञानिक रुग्णांच्या कॅन्सर पेशींचे थेट विश्लेषण करून उपचारांची निवड करू शकतील.
यापूर्वी उपचारांची निवड ही रुग्णावर औषधांची थेट चाचणी करून, किंवा परदेशी नमुन्यांवर आधारित माहिती वापरून केली जात होती. मात्र आता प्रयोगशाळेतच रुग्णांच्या पेशींपासून ऑर्गनॉइड्स (अवयवासारखे पेशीगट) तयार करून, त्यावर वेगवेगळ्या औषधांची परिणामकारकता तपासता येणार आहे. यामुळे उपचार निवडण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि कमी खर्चिक होणार आहे.
‘आयआयटी मद्रास’च्या टीनने मागील सात वर्षांत कॅन्सरच्या जीनोम (जनुकीय रचना) व प्रोटीन क्रमांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून त्यातील बदल (म्युटेशन्स) शोधले आहेत. भारतातील रुग्णांसाठी खास तयार झालेल्या या टिश्यू बँकेद्वारे कॅन्सर पेशींपासून नवीन औषधांची चाचणी, बायोमार्कर (रोग ओळखणारे घटक) शोधणे, रक्त तपासण्या, प्रयोगशाळेत तयार केलेले ऑर्गनॉइड्स तयार करणे, अशा अनेक गोष्टी शक्य होतील. यामुळे रोगाची कारणे ओळखणे आणि योग्य उपचार ठरवणे स्वस्त व जलद होईल. आयआयटी मद्रासच्या टीमने आतापर्यंत जवळपास सात हजार नमुने संकलित केले असून त्यात विविध प्रकारच्या कॅन्सर रुग्णांच्या पेशी आहेत. मागील सात वर्षांत या टीमने विविध कॅन्सरच्या जीनोमचा सखोल अभ्यास केला आहे.
भारतीय रुग्णांची भिन्नता
परदेशातील डेटा भारतीय रुग्णांसाठी पूर्णपणे लागू होत नाही. कारण काही कॅन्सर प्रकारांमध्ये भारतीय रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचे ‘फाउंडर म्युटेशन’ म्हणजेच विशिष्ट समुदायात मोठ्या प्रमाणात आढळणारे जनुकीय बदल आढळतात. या म्युटेशन्सचा वापर करून स्क्रीनिंग (लवकर निदान) व टार्गेट थेरपीज (लक्ष्यित उपचार) विकसित करता येतात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, स्तनाचा कॅन्सर, विशेषतः ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर, भारतीय महिलांमध्ये अधिक आक्रमक असतो. त्यामुळे उपचार निवडताना भारतीय नमुन्यांवर आधारित डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतातील नमुन्यांवर आधारित ही पहिलीच टिश्यू बँक असून ती कॅन्सर संशोधनाला व उपचारांना नवी दिशा देईल. यामुळे कोणत्या औषधांवर रुग्णांचा प्रतिसाद चांगला येईल हे ठरवणे सोपे होईल. – डॉ. अरुण सिंग, एम्स