मुंबई : होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देऊन त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध केला आहे. त्यातच आता महाराष्ट्र सीनिअर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशननेही (एमएसआरडीए) या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे शिक्षणचा दर्जा घसरवणार आणि जनतेची फसवणूक करणारा असल्याचे, मत एमएसआरडीएने व्यक्त केले आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा सीसीएमपी हा ब्रीज कोर्स पूर्ण केल्यावर त्यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करण्यास मान्यता देण्यासदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारने १५ जुलै २०२५ पासून या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा असून, आपत्कालिन परिस्थितीमध्ये चुकीचे औषधोपचार, चुकीचे निदान झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाला आयएमएकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यापाठोपाठ आता एमएसआरडीएनेही राज्याच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी हा एक वर्षांचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरवणारा, जनतेचा वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वास डळमळीत करणारा असल्याचे एमएसआरडीएने म्हटले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी वर्षानुवर्षे कठोर प्रशिक्षण आवश्यक असते. ते एका वर्षाच्या अभ्यासक्रमाद्वारे साध्य होऊ शकत नाही, असे मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने काढलेली अधिसूचना तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी एमएसआरडीएकडून करण्यात आली आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यातील रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा एमएसआरडीएने दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊन पारदर्शक कारभार करावा, असे आवाहनही राज्य सरकारला करण्यात आले आहे.
आयएमएकडूनही विरोध
एमबीबीएस पूर्ण करणारे डॉक्टर पूर्णपणे वैज्ञानिक आणि पुराव्यावर आधारित उपचार पद्धती शिकतात. बीएचएमएस डॉक्टरांचे शिक्षण पूर्णपणे होमिओपॅथीवर आधारित आहे. त्यांना आधुनिक औषध, शस्त्रक्रिया किंवा आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे वैज्ञानिक शिक्षण मिळत नाही. त्यामुळे जर अशा डॉक्टरला ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता मिळाली तर सामान्य रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आयएमएकडून करण्यात येत आहे.