मुंबईः घर भाडे तत्त्वावर घेताना जमा केलेल्या हमी रकमेच्या (डिपॉझिट) वादातून देवनारमध्ये एका घरमालकाने भाडेकरूच्या अंगावर मोटरगाडी घातली असून त्यात भाडेकरू गंभीर जखमी केला आहे. देवनार पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देवनार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जुलै रोजी घडली. जखमी भाडेकरू सय्यद अली घरमालक अनिल चव्हाण यांना डिपॉझिट म्हणून दिलेले दीड लाख रुपये मागण्यासाठी आला होता. अली यांनी बेंगनवाडी परिसरात सहा लाख रुपये डिपॉझिटवर एक खोली भाड्याने घेतली होती. मात्र घर सोडल्यानंतर त्यांना केवळ साडेचार लाख रुपये परत देण्यात आले. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते, पण वारंवार मागणी करूनही त्यांनी ती रक्कम दिली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अली यांनी २१ जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात चव्हाण यांनी अली यांच्या अंगावर मोटरगाडी घातली, असा आरोप आहे. त्या अपघातात अली गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अली यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून २३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवनार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपी चव्हाणला अटक केली. चव्हाण डोंबिवली येथील रहिवासी असून तो कंत्राटदार आहे.
रागाच्या भरात मोटरगाडी अंगावर घातली
गोवंडी येथील सावित्री बार समोर हा प्रकार घडला. अलीने पैशांची मागणी केली. दरवेळी पैसे देण्याचे आश्वासन देऊनही रक्कम न मिळाल्यामुळे अली संतप्त झाला होता. उभयतांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या चव्हाण यांनी अली यांच्या अंगावर मोटारगाडी घातली. त्यात अली यांच्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे देवनार पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची मागणी करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात या प्रकाराचे चित्रीकरण सापडलेले नाही. त्यावेळी उपस्थित असलेल्यांकडून पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.