मुंबई– खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला आहे. नेहा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. विष प्रयोग करून तिला मारण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशात राहणार्या नेहा गुप्ता (२४) या तरुणीचा विवाह १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणासोबत सोबत झाला होता. तो एका खासगी बॅंकेत नोकरी करतो. लग्नाच्या वेळी नेहाच्या वडिलांनी ९ लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि गृहोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र लग्नानंतर नेहाच्या सासरची मंडळी अधिकचा हुंडा मागत होते. त्यांनी मााहेरून महागडी दुचाकी आणण्यासाठी तगादा लावला होता. ती गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. हुंडा देत नसल्याने तिच्या पतीने घटस्फोटाची मागणी केली. त्रास कमी होत नसल्याने नेहाच्या आईने १८ मार्च रोजी खार पोलीस ठाण्यात तसेच राज्य महिला आयोगाकडेही कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. यानंतर जात पंचायतीची बैठक झाली. या बैठकीत नेहाला त्रास देणार नाही, असे तिच्या सासरच्यांनी सांगितले होते.
विष प्रयोग केल्याचा आरोप
मात्र परिस्थितीत काहीच सुधाऱणा झाली नाही. एप्रिल २०२५ मध्ये नेहा तिच्या पालकांच्या घरी गेली आणि सासरची मंडळी त्रास देत असल्याची तक्रार केली. तिला बाहेरचे पदार्थ खायला भाग पाडतात आणि त्यानंतर गुंगी येते असे तिने सांगितले. १६ ऑक्टोबर रोजी नेहाची तब्येत खालावल्याने तिला कूपर रुग्णालयात दाखल केल्याची माहिती नेहाच्या सासर्यांनी दिली. तिथे तिचा मृत्यू झाला. तिच्या सासरच्या मंडळीनी विषप्रयोग करून तिची हत्या केल्याचा आरोप नेहाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
६ जणांना अटक
या प्रकऱणी खार पोलिसांनी नेहा गुप्ताच्या सासरच्या ६ जणांविरोधात हुंडा मागणे, विष प्रयोग करणे, धमकी देणे, शारिरीक छळ करणे, संगनमत करून कट रचल्याप्रकरणी भारतीय न्यया संहितेच्या कलम ८०, १२३, ३, (५), ११५ (२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
