मुंबई : अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेचे शेवटचे स्थानक आता मंडाळेऐवजी चिता कॅम्प असणार आहे. या मार्गिकेचा मंडाळे ते चिता कॅम्प असा १.०२३ किमीने विस्तार होणार आहे. या विस्तारीकरणास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवून मंगळवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला. तसेच या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या २०५.५८ कोटी रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो २ बचे काम करीत आहे. हे काम सध्या वेगात सुरु असून शक्य तितक्या लवकर ही मार्गिका पूर्ण करून ती वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. असे असताना आता या मार्गिकेचा विस्तार होणार आहे. मंडाळे हे या मार्गिकेतील शेवटचे स्थानक आहे. आता मात्र मंडाळेऐवजी चिता कॅम्प हे मेट्रो २ ब मधील शेवटचे स्थानक असणार आहे. एमएमआरडीएने २०२१ मध्ये या संबंधीचा निर्णय घेत प्राधिकरणाच्या १५० व्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली होती. तर आता राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मंगळवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

हेही वाचा : “आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे, हजारो वर्षे…”; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

राज्य सरकारच्या मंजुरीमुळे आता विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीए चिता कॅम्प स्थानकाची बांधणी करणार आहे. तर आता २२.६४ किमीची मार्गिका १.०२३किमीने विस्तारीत होणार आहे. या मार्गिकेचा खर्च १०९८६ कोटी असून आता यात २०५.५८ कोटींची भर पडणार आहे. विस्तारीकरणाचा अतिरिक्त खर्च एमएमआरडीएला उचलावा लागणार असल्याचे या शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai state government approves expansion of metro 2 b line to cheeta camp instead of mandale mumbai print news css