मुंबई : तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असून नागरिकांना स्वयं तपासणीसाठी जागरुक करणे गरजेचे आहे. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, बरे न होणारे अल्सर किंवा रक्तस्त्राव, सतत सूज येणे किंवा आवाजात बदल होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्यांची स्वत: आरशामध्ये तपासणी करून लवकर निदान, वेळेवर उपचार आणि प्रतिबंध करता येऊ शकतो. यासाठी केवळ दोन मिनिटे आरशासमोर उभे राहावे लागणार आहे. याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबईमध्ये ‘टू-मिनिट ॲक्शन फाँर ओरल कॅन्सर प्रोटेक्शन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जागरुकतेचा अभाव…
भारतीयांमध्ये डोके आणि मानेचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यात तोंडाची पोकळी, ओरोफॅरिन्क्स, हायपोफॅरिन्क्स, नासोफॅरिन्क्स आणि स्वरयंत्रातील कर्करोगांचा समावेश आहे. डोके आणि मानेच्या कर्करोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत आणि त्यापैकी तोंडाच्या कर्करोगाची वाढ चिंतेचा विषय बनली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नागरिकांना लक्षणांबद्दल नसलेली कल्पना. तसेच नागरिक स्वयं तपासणी करीत नाहीत. तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे.
मौखिक तपासणी गरजेची
जवळजवळ ६५ टक्के रुग्ण प्रगत टप्प्यात डॉक्टरकडे उपचारासाठी जातात. त्यामुळे उपचारांना विलंब होऊन जगण्याचा दर कमी होतो. त्यामुळे महिन्यातून एकदा केवळ दोन मिनिटे आरशासमोर उभे राहून मौखिक तपासणी करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील निदान म्हणजे जलद, अधिक प्रभावी उपचार आणि बरे होण्याची शक्यता वाढते, अशी माहिती वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जेहान धाबर यांनी दिली.
उपचारास विलंब जीवघेणा…
ओठ आणि तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२२ मध्ये एक लाखांपेक्षा जास्त होती. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, २ आठवड्यांत बरे न होणारे अल्सर आणि असामान्य रक्तस्त्राव किंवा हलणारे दात आदी सर्वच बाबींच्या निरीक्षणासाठी आरशात मौखिक पाहणी करणे गरजेचे आहे. जबडा किंवा मानेमध्ये गाठी किंवा सूज, कर्कशपणा किंवा आवाज बदलणे, कानात किंवा गिळताना सतत वेदना होणे यासारखे बदल जाणवतात. आरशामध्ये कर्करोगाची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार करा, उपचारास विलंब जीवघेणा ठरू शकतो. वेळीच तपासणी केल्याने बरे होण्याची शक्यता वाढते, असा सल्ला मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जिमी मिरानी यांनी दिला.
स्वयं निदान महत्त्वाचे
देशात तोंडाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे वेळीच स्वयं निदान करणे महत्त्वाचे आहे. मौखिक तपासणी, तोंडाची स्वयं तपासणी, बायोप्सी आणि हिस्टो-पॅथॉलॉजिकल तपासणीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान शक्य होते. त्यामुळे वेळीच उपचार करता येतात. तोंडाच्या कर्करोगासंबंधीत काळजीमध्ये वेदना व्यवस्थापन, पोषक आहार, मानसिक समुपदेशन आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बोलणे तसेच गिळण्यास सुलभता येण्यासारख्या उपचारांचाही समावेश असल्याचे फिजिशियन आणि पॅलेटिव्ह केअर तज्ज्ञ डॉ. डेलनाझ जे. यांनी सांगितले.
तर उपचार करणे कठीण…
तोंडाच्या कर्करोगाची कारणे म्हणजे तंबाखूचा सेवन, अती मद्यपान आणि मानवी पॅपिलोमाव्हायरस संसर्ग. उशिरा निदान झाल्यामुळे तोंडाच्या कर्करोगावर उपचार करणे कठीण होते. नियमित स्वयं तपासणीद्वारे वेळीच निदान करणे हे परिणाम सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. तोंडाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतींमध्ये बोलताना, गिळताना आणि श्वास घेण्यात अडचण येणे, ऊतींमध्ये किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोगाच्या प्रसाराचा समावेश असू शकतो. तोंडाच्या कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केवळ दोन मिनिटे आरशासमोर उभे राहून तपासणी करणे हे नक्कीच फायदेशीर ठरणारे आह.