महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राला उल्हासित करणारा निर्णय घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ केली. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांला आता १० लाखांऐवजी ५० लाख रूपये, रौप्य पदक विजेत्याला ७.५ लाखांऐवजी ३० लाख तर कास्य पदक विजेत्याला ५ लाखांऐवजी २० लाख रूपये मिळणार आहेत. नुकत्याच ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कास्य पदकाची कमाई केली आहे.
खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या बक्षिसाच्या रकमेतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. त्यानुसार प्रशिक्षकांना अनुक्रमे अडीच लाखांऐवजी १२.५. लाख, १ लाख ८७ हजार ५०० रूपयांऐवजी ७.५ लाख आणि १.२५ लाखाऐवजी ५ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकातील मराठी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात राही सरनोबत (नेमबाजीत सुवर्ण पदक), अयोनिका पॉल (नेमबाजीत रौप्य पदक), गणेश माळी, ओंकार ओतारी व चंद्रकांत माळी (भारोत्तोलनात कांस्य पदक) यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी या स्पर्धेच्या रोख पारितोषिकात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांना शासकीय सेवेत विविध पदांवर सामावून घेण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतर पदक विजेत्यांनाही याप्रमाणे शासकीय सेवेत घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रकुल’ पदक विजेत्यांना राज्य सरकारची घसघशीत भेट!
महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राला उल्हासित करणारा निर्णय घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-08-2014 at 07:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in gift amount for commonwealth games winner