राज्यातील भीषण दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जनतेच्या मदतीसाठी अखेर काही उद्योगपती पुढे आले आहेत. बिर्ला, महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा या बडय़ा उद्योगसमूहांबरोबरच आयआरबी, सुपर कन्स्ट्रक्शन या बडय़ा बांधकाम कंपन्यांनी भरीव मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या पाच लाख रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त मोठे कलावंत किंवा मायानगरीतील तारे-तारकांनी दुष्काळग्रस्तांकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्य़ांतील ११ हजारांहून अधिक गावांमध्ये भीषण टंचाई आहे. पावसाळा येईपर्यंत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांना केले होते. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन दिले आहे. सहकारी संस्था व देवस्थानांनीही भरीव मदत केली. परंतु मोठमोठय़ा उद्योगांची मुख्य कार्यालये मुंबईत असताना एखाददुसरा अपवादवगळता बडय़ा उद्योगपतींनी छदामही दुष्काळग्रस्तांना दिला नाही. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर काही उद्योजक मदतीसाठी पुढे आले.
मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार २९ एप्रिलला महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा उद्योगाने १ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले. आदित्य बिर्ला उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी बुधवारी जागातिक कामगार व महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला. बांधकाम व्यावसायातील मोठय़ा कंपन्यांन्याही मदतीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. आयआरबी कंपनीने २ कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी दिले आहेत. त्याचबरोबर सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीने ५० लाख रुपयांची मदत केली आहे. लार्सन अँड टुब्रो, गोदरेज फाऊंडेशन या उद्योगांनी या पूर्वीच दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदत दिली आहे. गेल्या आठवडय़ात आशा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांची मदत दिली. परंतु चित्रपटसृष्टीतील अन्य कुणी कलाकार अजून मदतीसाठी पुढे आलेला नाही.