शैलजा तिवले

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील नर्सिगच्या १४ विद्यार्थिनींना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येऊनही आम्हाला वेळेवर रुग्णालय प्रशासनाने कळविले नसल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे.

लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण काही कालावधीनंतर करोनाबाधित असल्याचे आढळले. त्या वेळी रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना अलग राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या; परंतु त्या रुग्णाची सेवा करत असलेल्या नर्सिगच्या विद्यार्थिनींना रुग्णालय प्रशासनाने कळविले नाही.

काहीच दिवसांत दोन विद्यार्थिनींना करोनाची लक्षणे आढळून आली. बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्समध्ये उपचारांसाठी पाठविले आहे. विद्यार्थिनींना वेळीच अलग न केल्याने त्या वसतिगृहात इतर विद्यार्थिनींसोबत राहत होत्या. वॉर्डमध्येही काम करत होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ जणींना संसर्ग झाला आहे.

प्रशिक्षण न देताच रुग्णसेवा देण्याकरिता दबाव

परिचारिकांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी विद्यार्थिनींना तीन दिवसांच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्षात एक दिवस केवळ चार तासांचे प्रशिक्षण देऊन १९-२० वर्षांच्या या मुलींना थेट करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी पाठविले आहे. मानसिक तयारी नसतानाही हे काम करण्यासाठी दबाव आणला गेला आहे. महिन्याला ५०० रुपये विद्यावेतनावर विद्यार्थिनी आठ ते दहा तास वॉर्डमध्ये काम करत असून याची दखल प्रशासनाने घ्यावी, असे क्लिनिकल नर्सिग अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ. स्वाती राणे यांनी म्हटले आहे.