कुलदीप घायवट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील झाडीत, मोठय़ा झाडांवर सातभाई आढळतात. मात्र, त्यांच्या रंगसंगतीमुळे पटकन ते दिसत नाहीत. सहा-सात किंवा त्यापेक्षा जास्त जणांच्या समूहात राहणारा पक्षी म्हणजे सातभाई. ते ‘एकसाथ’, ‘साथसाथ’ किंवा सात जणांच्या समूहाने राहत असल्याने त्यांना सातभाई असे नाव पडले असावे. अत्यंत सतर्क, शत्रू पक्षावर कायम नजर ठेवून एकत्र समूहाने लढून त्याला हाकलून लावणे, हे त्याचे गुणविशेष. मात्र त्याची उडण्याची क्षमता कमी असल्याने ते जास्त उंचीवर जात नाहीत. तसेच एकाचवेळी लांब पल्लाही गाठता येत नाही.

बदाम, कडुनिंब, गुलमोहोर अशा झाडांवरून येणारा ‘क्वाय.. क्वाय.. क्वाय’ असा आवाज सातभाईंचा. या आवाजामुळे सातभाईला स्थानिक भाषेत ‘कोकी’, ‘कोक्या’ असेही म्हणतात. टिमॅलिडी या पक्षिकुलात सातभाई पक्ष्याचा समावेश होतो. हा पक्षी देशात सर्वत्र आढळून येत असून तो कोरडय़ा मैदानी व डोंगराळ प्रदेशात राहतो. समुद्री सपाटीपासून १,२२० मी. पेक्षा जास्त उंचीवरील किंवा दाट जंगलात ते दिसत नाहीत. देशात मोठा सातभाई, छोटा सातभाई, मोठा राखी सातभाई आणि पिवळय़ा डोळय़ाचा सातभाई या जाती आढळतात. या पक्ष्याच्या जातीप्रमाणे विविध रंगसंगती आणि आकारात बदल होतो.

बडा सातभाई हा पक्षी समूहात राहतो. त्याचा आकार साळुंकीपेक्षा लहान असून मातकट रंगाचा असतो. पोटाकडील भाग पिवळसर असतो. शेपटी लांब असते. समूहात राहत असल्याने अनेकदा त्यांच्यातच भांडणेही होतात. ते एकमेकांवर हल्ला करतात. मात्र, भांडणे मिटवून पुन्हा एकत्र येतात. शत्रूने हल्ला केल्यास बडा सातभाई शत्रूवर समूहाने हल्ला करून त्याला पिटाळून लावतात. हा पक्षी अन्नाचा शोध घेताना सलग एकसारखा कर्कश आवाजात ओरडतो.

बुलबुल पक्ष्याएवढय़ा आकाराचा छोटा सातभाई असतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्याच्या पाठीचा रंग गडद तपकिरी असून त्यावर ठिपक्यांच्या रेघा असतात. डोक्याचा भाग मातकट रंगाचा असतो. गळा पिंगट पांढऱ्या रंगाचा असतो. डोळे पिवळय़ा रंगाचे, चोच फिकट तपकिरी रंगाची, पोटाचा भाग पिवळसर रंगाचा असतो. शेपटी लांब, निमुळती व साधारण हिरव्या-तपकिरी रंगसंगतीची असते. पाय साधारण हिरवे-पिवळे रंगाचे आणि नखे काळसर असतात. मोठा राखी सातभाई हा करडय़ा तपकिरी रंगाचा असतो. डोके करडय़ा रंगाचे असते आणि शेपटीची लांब पिसे पांढऱ्या रंगाची दिसते. तर पिवळय़ा डोळय़ाचा सातभाई हा पक्षी बुलबुलापेक्षा थोडा लहान असतो. हा ‘चीप-चीप’ असा आवाज काढतो. त्याचा रंग तांबूस रंगाचा, नारिंगी-पिवळय़ा रंगाच्या पापण्या व डोळे पिवळे असतात.

सातभाई या पक्ष्याचा मार्च-मे आणि जुलै-सप्टेंबर असा वर्षांतून दोनदा विणीचा हंगाम असतो. दाट झुडपात किंवा गवतात पटकन दिसणार नाही अशी जागी ते घरटे बांधतात. परंतु ते एक मीटरपेक्षा जास्त उंचीवर नसते. घरटे वाटीसारखे असून मुळय़ा, काटक्या वापरून बांधलेले असते. आतून मऊ पदार्थानी मढविलेले असते. मादी फिकट निळय़ा रंगाची अंडी घालते. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे अशी कामे नर व मादी दोघेही करतात.

सातभाईच्या घरटय़ात चातक आणि पावशा पक्षी अंडी घालतात. हे पक्षी एकत्र समूहाने भक्ष्य शोधतात. जमिनीवरील किडे, धान्याचे दाणे, लहान फळे, फुलातील मध हे त्यांचे मुख्य अन्न आहे. जमिनीवर समूहाने उतरून उदरनिर्वाह करतात. त्यावेळी एकजण झाडांवर बसून शत्रूचा अंदाज घेत टेहळणी करतो. तर इतर भक्ष्य खाणे शोधतात. त्यानंतर आलटून पालटून हे काम करत असतात. त्यामुळे उडण्याची क्षमता इतर पक्ष्यांच्या तुलनेने कमी असली तरी शत्रूपासून ते आपले आणि आपल्या समूहाचे रक्षण करतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jungle babbler birds found in group jungle babbler birds in mumbai zws