अभिनेत्री कंगना रनौट हिची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर कक्षाचे पथक शनिवारी सायंकाळी तिच्या घरी गेले. पोलिसांनी कंगनाचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली.
कंगना आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यात बनावट इमेल पाठविण्याच्या आरोपांवरुन कायदेशीर लढाई सुरु असून सायबर कक्षाने कंगनाला जबाब नोंदविण्यास सांगूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले. सायबर कक्षाने शनिवारी कंगनाचा जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी तिच्यासोबत तिची बहिणही होती. कंगनाकडून पोलिसांना अनेक नव्या गोष्टी समजल्या असून त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.रात्री ८ वाजेपर्यंत जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. २०१४ मध्ये हृतिकने आपल्या नावाने कोणीतरी बनावट इमेल आयडी तयार केला असून त्याचा वापर करुन चाहते आणि चित्रपट क्षेत्रातील काही कलाकारांशी संवाद साधला जात असल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती.