मुंबई : मिरा-भाईंदर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची सुमारे १४२ कोटींची फसवणूक करणाऱ्या परदेशी टोळीतील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये सापडला असून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेशी समन्वय साधून प्रत्यार्पण प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इगोर युर्चेन्को हा सध्या युक्रेनमध्ये असल्याची माहिती तेथील स्थानिक यंत्रणांनी मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने जारी केलेल्या ब्लू कॉर्नर नोटीसच्या आधारावर ही माहिती मिळाली आहे. आरोपी टोरेस फसवणुकीतील मुख्य सूत्रधारांपैकी आहे. या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच तो आणि इतर आठ परदेशी साथीदार भारतातून फरार झाले होते. युक्रेनकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. लवकरच इंटरपोलमार्फत युक्रेन सरकारकडे अधिकृत प्रत्यार्पणाची विनंती केली जाणार असून, सर्व कागदपत्रांचे युक्रेनमधील स्थानिक भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. केंद्रीय विभागांच्या माध्यमातून ती सर्व कागदपत्रे व आरोपीविरोधातील पुरावे युक्रेनमधील यंत्रणांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी दादर येथील टोरेसच्या मुख्य कार्यालयात बसायचा. तसेच तो सर्व शाखांमध्ये जाऊन कामकाजाची पाहणी करायचा, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत मिळाली आहे.

मराठी कागदपत्रांचे भाषांतर

युक्रेनमध्ये इगोर नावाचा आरोपी सापडल्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी कागदोपत्री कारवाई पूर्ण केली आहे. या प्रकरणातील सर्व साक्षीदारांचे जबाब, आरोपपत्र व इतर कागदपत्रे मराठी भाषेत होती. त्याचा युक्रेनमधील स्थानीय भाषेत अनुवाद केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस पथक काम करत आहे. गुन्हे शाखेच्या समन्वयाने ही कागदपत्रे लवकरच युक्रेनच्या यंत्रणांना पाठवण्यात येणार आहेत.

फरार आरोपींविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस

● मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर या भागांतील १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची या प्रकरणात १४२ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा संपूर्ण कट युक्रेन देशातील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. ● या प्रकरणात युक्रेन देशाचे आठ नागरिक आणि एक तुर्कस्तान देशाचा नागरिक सध्या फरार आहेत. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि युगोर युर्चेन्को यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.