गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी एएनआयला दिली आहे. तसंच ज्यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे आभारही मानले आहेत. लता मंगेशकर या लवकरच घरी येतील, त्या क्षणाची आम्ही वाट पाहतो आहोत. या प्रसंगात आमच्या कुटुंबीयांना तुम्हा सगळ्यांकडूनच बळ मिळालं असंही लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्या औषधोपचांराना योग्य प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांची पुतणी रचना यांनी दिली. सध्या आम्ही त्यांची प्रकृती उत्तम होण्याची वाट पाहत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.