मुंबई : मुलुंड परिसरात बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बिबट्याचे छायाचित्र प्रसारित झाल्याचे समोर आले आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपवर ‘मुलुंड पश्चिम येथे बिबट्या दिसला’ असा दावा करणारे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात होते. प्रत्यक्षात मात्र ते छायाचित्र एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आले असून, परिसरातील सीसी टीव्ही किंवा वनविभागाकडे बिबट्या दिसल्याची कोणतीही नोंद नाही, असे रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे (रॉ) पवन शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, मात्र समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नये, असे आवाहन वनविभाग, तसेच प्राणी संस्थांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बनावट छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत तयार करणे अतिशय सोपे झाले असून, त्यामुळे खोटी माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीबरोबरच सायबर तपासणी अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
अशा अफवांमुळे निर्माण होणारे धोके
- नागरिकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण.
- गर्दी आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो.
- वन्यप्राण्यांबाबत गैरसमज.
- सायबर गुन्हे आणि चुकीची माहिती पसरविण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका.
चिपळूणमध्येही ध्वनिचित्रफीत प्रसारित
काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील गांग्राई गावातील रस्त्यावर तीन ते चार बिबटे मुक्तसंचार करीत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली होती. ध्वनिचित्रफीतीची चौकशी केल्यानंतर एआयवर ही ध्वनिचित्रफीत केल्याचे निदर्शनास आले.
