मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील दिंडोशी परिसरातील गृहसंकुलात एका इमारतीत बसवलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात नुकताच एका नर बिबट्याचा वावर कैद झाला आहे. बिबट्या अत्यंत शांतपणे परिसरातून जाताना दिसून आला. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तसेच आरे वनक्षेत्रालगतच्या परिसरात रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेकदा बिबटे गोंधळल्यामुळे किंवा अडचणीच्या प्रसंगी मानवी वस्तीत शिरतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिंडोशीतील गृहसंकुलाच्या इमारतीत मध्यरात्री बिबट्या मुक्तसंचार करीत असताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. काही वेळाने बिबट्या गृहसंकुलातून गेल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफितीत आढळले. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात शक्यतो रात्री उशिरा बाहेर फिरणे टाळावे. याचबरोबर पाळीव प्राण्यांना सुरक्षित जागी ठेवावे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, कचरा उघड्यावर टाकल्याने प्राणी त्याकडे आकर्षित होतात. याचबरोबर बिबट्या परिसरात दिसताच १९२६ या क्रमांकावर संपर्क साधून वन विभागाला माहिती द्यावी. दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या गृहसंकुलात जनजागृती करण्यासाठी वनविभागाने कार्यक्रम आयोजित केला आहे.
कुत्र्यावर हल्ला
ठाणे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील येउर हिल्स परिसरात गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने एका भटक्या कुत्र्यावर हल्ला केला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनाची चाहूल लागताच बिबट्याने पकडलेल्या कुत्र्याला सोडून दिले. गोंधळलेल्या कुत्र्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही सेकंदातच बिबट्या अंधारातून पुन्हा बाहेर रस्त्यावर आला आणि कुत्र्याला परत पकडले.
घराच्या आवारात बिबट्याचा वावर
यापूर्वी आरेतील केलटी पाड्यातील एका घराच्या दारातच बिबट्याचा वावर सीसी टीव्ही कॅमऱ्यात कैद झाला. आरे वसाहत परिसरातील केलटी पाड्यामधील एका घराच्या दारात येऊन बिबट्या गेला होता. कुटुंबियांचे घराबाहेर लक्ष गेले आणि त्यांना बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्या अगदी दारातच आला आणि घरात डोकावून अगदी काही सेकेंदात निघून गेला. त्यानंतरनंतर सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रीकरण तपासले असता बिबट्याचा वावर त्यात कैद झाल्याचे निदर्शनास आले.