‘लोकांकिका’ ‘सर्व कार्येषु सर्वदा’, ‘दुर्गा’, ‘गप्पा’, ‘वर्षवेध’, लोकमान्य टिळक, सीडी देशमुख, कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पुल देशपांडे आणि अगदी अलीकडील छत्रपती शाहू महाराजांवरील ‘राजर्षि’ ही विशेष प्रकाशने अशा अनेक श्रीमंत उपक्रमांनंतर ‘लोकसत्ता’ आता मराठी संस्कृतीचा बहुआयामी सौंदर्योत्सव आयोजित करत असून लवकरच ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ची मुहूर्तमेढ रोवली जाईल. मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, मराठी मुशायरा, शिल्प, चित्र अशा जगणे श्रीमंत करणाऱ्या सर्व कलांचा यात अंतर्भाव असेल.
मराठीत सर्वसमावेशक असा ‘लिटफेस्ट’ नाही. जयपूर येथे नियमितपणे भरवला जाणारा साहित्योत्सव अथवा उर्दू, हिंदीप्रेमींसाठी भरणारा ‘जश्न-ए-रेखता’ अशा वाचकस्नेही, प्रेक्षकस्नेही, कलासक्त कार्यक्रमांची वानवा लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’तर्फे अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून त्यात मराठी संस्कृतीशी संबंधित अनेक कला, कलाकार यांचा सहभाग असेल. मराठी प्रकाशकांकडून काही विशेष प्रकाशन सोहोळे, रंगभूमीवरील नवे प्रयोग आदींस यात विशेष स्थान असेल आणि मुंबईच्या विविध उपनगरांत आठवडाभर त्याचे आयोजन केले जाईल. मराठीस चित्र, शिल्पकलांची प्रदीर्घ परंपरा आहे आणि आजही मराठी चित्र-शिल्प कलाकार आंतरराष्ट्रीय मंचावर विविध प्रयोगांद्वारे आपला ठसा उमटवत आहेत. अशा अनवट कला आणि कलाकारांनाही सदर ‘अभिजात’मध्ये विशेष स्थान असेल.
ऐहिक श्रीमंतीचे दर्शन घडवणाऱ्या दीपोत्सवापाठोपाठ संस्कृती ऐश्वर्याचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येत्या आठवड्यात या उपक्रमाविषयी अधिक तपशील जाहीर केला जाईल.