मुंबई : यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’साठी निवड करण्यात आलेल्या नऊ दुर्गांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील दादर येथील ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात होणार आहे. संध्याकाळी ६.१५ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. हा वितरण सोहळा सर्वांसाठी खुला आहे.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ दुर्गांचा गौरव केला जातो. यंदा या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या निवड समितीमध्ये स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या शारदा साठे, पत्रकार, लेखिका, नाट्य-चित्रपट अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार विजेत्या आणि सुप्रसिद्ध कठपुतळी कलाकार, अभिनेत्री मीना नाईक यांचा समावेश होता. या वेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्री कलाकारांच्या वाद्यावृंदीय आविष्काराचा आनंदही उपस्थितांना घेता येईल.

हा सोहळा सर्वांसाठी खुला असणार आहे. एका व्यक्तीस एकच प्रवेशिका दिली जाणार असून नाट्यगृहात कार्यक्रमापूर्वी अर्धा तास आधी वितरित केल्या जातील. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल. काही जागा राखीव असतील.

निवड झालेल्या दुर्ग

डॉ. आरोही कुलकर्णी – सूक्ष्म जैवतंत्रज्ञानातून शाश्वत विकास

डॉ. अर्चना गोडबोले – ‘अप्लाइड एन्व्हायरन्मेंटल रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना, हजारो एकर खासगी जंगलांचे संरक्षण

डॉ. बीना नायर – मोहरी आणि जवस पिकावर संशोधन

भाग्यश्री लेखामी – युवा सरपंच, गावांना विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या

कुसुम बाळसराफ – १८ लाख स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या

डॉ. मंजिरी पांडे – अणुऊर्जा कार्यक्रमासाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान

डॉ. स्वप्नजा मोहिते – ७५ हून जास्त तलावांचे पुनरुज्जीवन, माशांच्या जातींचे संरक्षण

वैशाली भांडवलकर – १५ हजार भटक्या-विमुक्त वर्गातील मुलांना शिक्षणाची संधी

शांता गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ लेखिका, पत्रकार, मराठी-इंग्रजी अनुवादक, चित्रपट-कला समीक्षक शांता गोखले यांना यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. ‘रीटा वेलिणकर’, ‘त्या वर्षी’, ‘निर्मला पाटीलचे आत्मकथन’ अशा आत्मनिर्भर जगण्याचे भान देणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन शांता गोखले यांनी कलेे आहे. त्याशिवाय ‘द वे होम’, ‘वन फूट इन द ग्राउंड’ हे इंग्रजीतील लेखन, तसेच चिं. त्र्यं. खानोलकरांचे ‘अवध्य’, तसेच ‘श्यामची आई’, ‘स्मृतिचित्रे’ , ‘सखाराम बाईंडर’ ,‘बेगम बर्वे’आदी दर्जेदार साहित्यकृतींचा इंग्रजी अनुवाद अमराठी वाचकांपर्यंत पोहोचवून मराठी आणि इंग्रजी साहित्यविश्वात स्वत:चे भक्कम स्थान त्यांनी निर्माण केले.

● मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाउंडेशन

● सहप्रायोजक : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स, मे. बी. जी. चितळे डेअरी, केसरी टूर्स, पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हि एम मुसळुणकर ज्वेलर्स, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : डीडीएसआर ग्रुप, चैतन्य अस्सल मालवणी, भोजनगृह आणि क्रेडाई एम सी एच आय ठाणे