अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण घेत गावातल्या आदिवासी मुलांनाही शिक्षणाची गोडी लागावी म्हणून स्वत:च्या घरातच शाळा सुरू करणाऱ्या यंदाच्या चौथ्या दुर्गा आहेत- नासरी चव्हाण. शिक्षणाबरोबरच आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वत: शिकून ते आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणाऱ्या, त्यात नवनवीन प्रयोग करणाऱ्या, शासकीय आरोग्य पथकाच्या मदतीने गावातील मुलांमधल्या कुपोषणावर मात करत बालमृत्यूची संख्या कमी करणाऱ्या नासरी चव्हाण यांच्या कर्तृत्वाविषयी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातपुडय़ाच्या पायथ्याशी दुर्गम भागात राहणारे आदिवासी मुख्य प्रवाहापासून कोसो दूर. समस्यांच्या गर्तेत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींची अत्यंत दयनीय परिस्थिती स्वत:ही अनुभवल्यामुळे

नासरी चव्हाण या तरुणीने समाजपरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला. शिक्षण, कृषी आणि आरोग्य या मूलभूत गोष्टींवर भर देत नासरीने आदिवासी बांधवांमध्ये जागृतीची चळवळ गतिमान केली. गेल्या ५ वर्षांपासून हा प्रबोधनाचा जागर सुरू असून समाजपरिवर्तनाचा नवा ‘नासरी’ पॅटर्न रुजला आहे. परिणामी, दुर्लक्षित आदिवासींच्या जीवनात नवीन प्रकाशवाट निर्माण झाली आहे.

अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा हे १००-१२५ घरांचे छोटे गाव. साधारणपणे या गावातील रहिवासी हा आदिवासी. त्यांची मुख्य भाषा ही कोरकू. भाषेचा मुख्य अडथळा असल्याने शासनाच्या योजना आणि त्यांचा प्रचार, प्रसार करण्याचे यंत्रणांपुढे एक मोठे आव्हानच. त्यामुळे वर्षांनुवर्षे उपेक्षित असलेल्या या समाजाला शिक्षणाचा गंध नाही. घरात अठराविशे दारिद्रय़. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक शेती व आजूबाजूच्या गावांत मोलमजुरी करण्याशिवाय दुसरे साधन नाही. या सर्व परिस्थितीला बदलण्यासाठीच जणू नासरीचा जन्म झाला, असे म्हणल्यास वावगे ठरू नये. आई-वडील व तीन भावंडं असे चव्हाण कुटुंब. वडिलांची ५ एकर कोरडवाहू शेती. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून. नासरीचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. शालेय वयातच तिला शिक्षणाचे महत्त्व पटल्याने  पुढील शिक्षण सुरूच ठेवण्याचा निश्चय तिने केला; पण तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने नासरीच्या संघर्षांला प्रारंभ झाला.

आठवीनंतरच्या शिक्षणासाठी घरापासून १२ कि.मी. दूरच्या शाळेत जावे लागत असल्याने तिला दररोज १६ कि.मी.ची पायपीट करावी लागायची. दळणवळणाचे कुठलेही साधन नसल्याने जंगलातून शाळेत जाता-येताना अनेक वेळा वन्यप्राण्यांचा  सामना करावा लागला, तर कधी पूर आलेले नदी-नाले वाट अडवीत होते. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सध्या ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत आहे. मात्र दरम्यान, तिच्यासोबत गावात शिकणाऱ्या इतर मुलींची शाळा सुटून त्या शेतात काम करू लागल्या होत्या. गावातील इतर मुलेही शिक्षणापासून दुरावत असल्याचे पाहून नासरी अस्वस्थ व्हायला लागली. तिने आपल्या घरातच शाळा सुरू केली. दररोज संध्याकाळी मुलांना शिकवण्याचा उपक्रम सुरू झाला. गेल्या ५ वर्षांपासून नासरीची ही शाळा सुरू आहे. आज ३० मुलं शिक्षणाचे धडे गिरवतात. हे तिचे एकल विद्यालय. विद्यार्थ्यांचा वयोगट नाही, वर्गाची अटही नाही. ‘‘त्यांना एकदा का शिक्षणाची गोडी लागली, की त्यांचे आयुष्य आपसूक बदलू लागेल. मी फक्त त्यासाठी एक माध्यम आहे,’’ असे नासरी सहजपणे बोलून जाते. पैशांचे पाठबळ नसल्याने ती स्वत: शेतात काम करून त्यातून आलेल्या पैशांतून शाळेतील मुलांना वही-पेन्सिल घेऊन देते. तिच्या या प्रयत्नाचं फळ म्हणजे ही सगळी मुलं आता नियमित शाळेत जाऊ लागली आहेत.

नासरीला आपल्या सामाजिक कार्याला शिक्षणापुरतेच मर्यादित ठेवायचे नव्हते. सरकारच्या योजनांचा लाभ आणि सरकारी अनुदान गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ती धडपडत असते. आदिवासी समाज संपूर्णत: पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून. यामध्ये बदल घडविण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार करण्याचा निर्णय तिने घेतला. त्याची सुरुवात तिने स्वत:च्या घरापासून केली. नासरीला शिक्षणासोबतच लहानपणापासून शेतीची नितांत आवड होतीच. नासरीचे वडील शेकटय़ा चव्हाण हे गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याने नासरीच्याही शब्दाला गावांत मान होता. त्याचाच आधार घेत नासरीने गावात विविध योजना, कृषी तंत्रज्ञान रुजवले. कृषी विभागाने कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून गावात घेतलेल्या शेतीशाळेत नियमित हजेरी लावून तिने कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. कंपोस्ट खत प्रक्रियेच्या माध्यमातून गावातील शेणखताच्या उकिरडय़ांचे सेंद्रिय खतात रूपांतर केले. हे खत शेतात वापरल्याने रासायनिक खतांचा खर्च कमी झाला. गावातील उकिरडय़ांचे सेंद्रिय खतात परिवर्तन झाल्याने स्वच्छता नांदायला लागली. गावात सेंद्रिय शेतीच्या चळवळीला चालना मिळाली. सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, एस-९ कल्चर, कंपोस्ट तयार होऊन गावातील शेती पद्धतीत बदलाचे वारे वाहू लागले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले गेल्याने गावांत बीजप्रक्रिया करून पीक लागवड केली जाते. नासरीच्या मार्गदर्शनाखाली कीडनाशकांचे उत्पादन शेतकरी स्वत: करतात.

मागील ५ वर्षांपासून गावातील शेतकरी उताराला आडवी पेरणी, जलसंधारणाचे विविध उपक्रम प्रत्येक शेतामध्ये करतात. त्याचा सकारात्मक परिणाम होत असून, शेतीत पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. पीक उत्पादनात वाढ होत असल्याने येथील शेतकऱ्यांनीही समृद्धीच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. तिच्याच पाठपुराव्यामुळे या आदिवासीबहुल गावांमध्ये शासकीय योजना शेळी व कुक्कुटपालन योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली. गावातील अनेक कुटुंबांना शेतीपूरक व्यवसायाचा आधार मिळाला.

या परिसरात आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकला होता. कुपोषण, बालमृत्यू, आरोग्याविषयी उदासीनता या मुद्दय़ांविरोधातही तिने काम करण्याचे ठरवले. त्यासाठी तिने मदत घेतली ती शासकीय आरोग्य पथकांची. गावातील गर्भवती स्त्रियांना सकस आहार घेण्याविषयी माहिती देण्यासोबतच गावातील अंगणवाडीत येणाऱ्या आरोग्य पथकापर्यंत या महिलांना घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेते. या प्रयत्नांमुळे गावातील बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. नासरीने केलेल्या कार्यामुळे तिच्या स्वत:च्या गावासोबतच आजूबाजूच्या ७ गावांमध्ये सकारात्मक बदल घडला असून माजी तालुका कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने यांची प्रेरणा यामागे असल्याचे नासरी सांगते. विकास या शब्दाचा अर्थही न कळणाऱ्या आदिवासीबहुल गावांसाठी खूप काही करण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक दातृत्वाचीही गरज आहेच. ती मदत तिला मिळेल असा तिला विश्वास वाटतो. नासरीने भौतिक सुखसुविधा नसतानाही विपरीत परिस्थितीवर मात करत परिवर्तनाचा लढा उभारला. तिच्या कर्तृत्वाला सलाम!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta durga with nasari chavan