मुंबई: महादेव बुक बेटिंग सट्टेबाजी अॅप प्रकरणातील आरोपींनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, मुंबईजवळ एक पंचतारांकित हॉटेल उघडण्याच्या प्रयत्नात होता. ही मालमत्ता बेनामी असून त्याबाबत ईडी अधिक तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ईडी याप्रकरणी गैरव्यवहारातील रकमेतून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तांचा शोध घेत आहे. भोपाळमधील बेनामी मालमत्तेचा या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्याशी संबंध आहे का? याबाबत ईडी तपास करत आहे. बंगला व जमिनीच्या स्वरूपात ही मालमत्ता असून याशिवाय मुंबईजवळ हॉटेल घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>> माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच
अभिनेता रणबीर कपूर, हुमा कुरेशी, हीना खान आणि कपिल शर्मा यांना महादेव ऑनलाइन सट्टेबाजी अॅपप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅपची जाहिरात करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर व भागीदार रवी उप्पल आहेत. या संपूर्ण बेटिंग व्यवसायाची उलाढाल पाच हजार कोटींच्या घरात असल्याचा ईडीला संशय आहे. हे अॅप यूएईमधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे. अॅपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, दुबई, श्रीलंका येथून कॉल सेंटर चालवले जात असल्याचा ईडीला संशय आहे.