मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाप्रकरणी समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला असून याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले. समय सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे उपस्थित राहून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी मागितला होता. पण सायबर विभागाने त्याला नकार देत १७ फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने समय रैना, रणवीर अलाहबादियासह ३० जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडियाज गॉट लेटेंट’चे एकूण १८ भाग युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचे सायबर विभागाने सांगितले. तसेच या भागांमध्ये अश्लील टीका टिप्पणी केल्याचे आढळल्यास त्या सर्वांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षकांना यात साक्षिदार बनविणार असल्याचेही सायबर विभागाने सांगितले. रैना याच्या या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलावण्यात येते. एका भागामध्ये यूट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई – वडिलांबाबत अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह विधाने केली होती. याप्रकरणी खार पोलिसांकडूनही प्राथमिक चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने देखील याविरुद्ध गुन्हा रैना, रणवीरसह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या रणवीरच्या उपस्थितीत असलेल्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना यात आरोपी करून त्यांना समन्स बजाविण्यात येत आहे. समय रैना हाही याप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने सांगितले होते. समयच्या वतीने त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाशी संपर्क साधून त्याला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्याला महाराष्ट्र सायबर विभागाने नकार देत समयला १७ फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले. दरम्यान, समय रैनाने ‘एक्स’वर पोस्ट करत युट्युबवरील सर्व चित्रफीती हटवल्याचा दावा केला होता. जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनेलवरून ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि मजा करणे हा माझा एकमेव उद्देश होता. त्याची चौकशी निष्पक्षपणे पूर्ण व्हावी. यासाठी मी सर्व तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करेन, असे समय रैनाने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cyber cell issues second summons to samay raina in india got latent row mumbai print news zws