मुंबईः महाराष्ट्रात प्रकल्प गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक आहेत. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे देशी-विदेशी गुंतवणूक आकर्षिण्यात अग्रणी स्थान आहे. राज्याच्या उद्यमशील प्रगतीतील आगामी संधी आणि आव्हानांचा वेध घेणारे सर्वंकष मंथन याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) होत असलेल्या ‘लोकसत्ता उद्योगचर्चा’ या कार्यक्रमातून केले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

राज्याचे औद्योगिक धोरण, व्यवसायसुलभ वातावरण, पायाभूत सोयीसुविधा, नवनव्या क्षेत्रासाठी तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ उपलब्धता, सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमई) उद्योगांचे पूरक जाळे अशा वेगवेगळ्या पैलूंवर उद्योजक आणि तज्ज्ञ विश्लेषकांचा प्रशासन व धोरणकर्त्यांशी थेट संवादाचा ‘लोकसत्ता उद्योगचर्चा’ हा कार्यक्रम सोमवारी मुंबईत आयोजिण्यात आला आहे. एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट खुणावत असलेल्या महाराष्ट्राच्या उद्यमशील विकासाच्या वाटचालीसाठी ही एक दिशादर्शक चर्चा ठरेल.

औद्योगिक विकासासाठी राज्यात आणखी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक त्रुटी आहेत, तर त्या कोणत्या, उद्योगधंद्यांच्या उभारणीत सुलभतेसाठी आणखी कशाला प्राधान्य दिले जावे, कौशल्य विकास व मनुष्यबळ गुणवत्तेत वाढीसाठी आवश्यक प्रयत्न या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांचा या निमित्ताने वेध घेतला जाईल.

परिसंवादात सहभागः

  • अनंत गोएंका, उपाध्यक्ष, आरपीजी समूह
  • दिनेश जोशी, सह-अध्यक्ष ‘फिक्की’-महाराष्ट्र आणि अध्यक्ष, सत्यगिरी समूह
  • प्रतीक अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, स्टरलाइट पॉवर
  • राधाकृष्णन बी., अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ‘महाजेन्को’
  • दीपेंद्र सिंग कुशवाह, विकास आयुक्त, महाराष्ट्र शासन

समारोपः

पी. वेलारासू, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

मुख्य प्रायोजक : – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्ड बाय – वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई</p>