मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळणारे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती अशी प्रतिमा असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मालमत्तेबाबत गुप्त चौकशी सुरू करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. अशाच प्रकारे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काही आजी-माजी बडय़ा अधिकाऱ्यांच्या संपत्तीबाबतचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणेने त्याबाबत गुप्तता पाळली आहे.
मूळचे अकोल्याचे असलेले डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना गृहराज्यमंत्री (शहरे) म्हणून समावेश करण्यात आला. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास, विधी व न्याय या महत्त्वाच्या खात्यांचेही तेच राज्यमंत्री आहेत. विधिमंडळ कामकाज खातेही त्यांच्याकडेच आहे.
विशेष म्हणजे, रणजित पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेसंबंधी चौकशी सुरू झाली आहे.
अशाच प्रकारे आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मालमत्तेबाबत तपास सुरू आहे. त्याशिवाय अनेक बडे अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यात अकोला महापालिकेचे तीन माजी आयुक्त, उच्च शिक्षण संचालक, आठ सहसंचालक, अमरावतीमधील दोन आजी-माजी नगरसेवक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील एक मुख्य अभियंता, महाबीज कंपनीचे महाव्यवस्थापक, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक इत्यादी काही मोठय़ा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता, एखाद्या तक्रारीची शहानिशा करणे, एवढय़ापुरता एखादा विषय मर्यादित असू शकतो, तक्रारी खऱ्या असतातच असे नाही, परंतु त्याचा खरे-खोटेपणा तपासावा लागतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2015 रोजी प्रकाशित
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या मालमत्तेची गुप्त चौकशी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळणारे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती अशी प्रतिमा असलेले राज्याचे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-03-2015 at 02:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state home minister ranjit patil property secret inquiry