मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून आजतागायत ६९७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. वर्षभरात छपाई होऊन तयार झालेली पुस्तके मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची परंपरा असून यंदा ५१ नवीन पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरूवार, २७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ५१ नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैविध्यपूर्ण नवीन ५१ पुस्तकांमध्ये रमेश वरखेडे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास खंड ३ (१९५१-२०१०)’ समाविष्ट आहे. युगप्रवर्तक विष्णू नारायण भातखंडे यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील स्थान महत्त्वाचे असून ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत रामदास भटकळ यांनी लिहिलेले विष्णू नारायण भातखंडे यांचे चरित्र मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विपुल लेखन सुमारे दहा हजार पृष्ठे व १८ खंडांमध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केले असून वाचकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

मराठीतील ‘अक्षरबालवाङ््मय’ या ग्रंथप्रकल्पांतर्गत डॉ. मंगला वरखेडे यांनी संपादित केलेले चार खंड यापूर्वी मंडळाने प्रकाशित केले असून आता खंड ५ ‘कथामंजुषा’ व खंड ६ ‘वाचनदीपिका’ हे दोन खंड मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. डॉ. रंजन गर्गे संपादित केलेले शास्त्र व विज्ञान ग्रंथ मूलभूत विज्ञान खंड १ (१८६४ ते १९४७) शास्त्र व विज्ञान ग्रंथ उपयोजित विज्ञान खंड २ (१८६४ ते १९४७) व शास्त्र व विज्ञान ग्रंथ गणित विज्ञान खंड ३ (१८६४ ते १९४७) हे तीन खंड, तसेच डॉ. दिलीप धोंडगे यांनी संपादीत केलेला मराठी वाङ््मयकोश खंड दुसरा भाग दोन ‘मराठी ग्रंथकार (दिवंगत)’ (इ.स. १९६० ते इ.स.  २०००) खंड  मंडळाच्यावतीने प्रकाशित होत आहे. रशियाची सर्वांगीण ओळख करून देणारे व डॉ. मेघा पानसरे यांनी लिहिलेले ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ हे सचित्र पुस्तक आणि डॉ. नरेंद्र डेंगळे यांचा वास्तुकलेसंदर्भातील ‘महाराष्ट्रातील वास्तुकला परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

हा साहित्य खजिना पुन्हा वाचकांच्या भेटीला…

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झालेली कानडी साहित्य परिचय, महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव किर्लोस्कर, स्वामी रामानंद तीर्थ, बॅ. नाथ पै, दादासाहेब फाळके, एस. एम. जोशी, गोविंदभाई श्रॉफ, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, यदुनाथ थत्ते, आराधना, थेरी गाथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास, मानवी आनुवंशिकता, महाराष्ट्राचा इतिहास (प्रागैतिहासिक) महाराष्ट्र खंड १ भाग १, कन्नड-मराठी शब्दकोश मराठी शब्दकोश खंड १ (अ ते औ), अस्पृश्यांचा लष्करी पेशा, स्वातंत्र्याचे भय मराठी शब्दकोश खंड २ (क ते ङ), तुळशी मंजिऱ्या व मराठी शब्दकोश खंड ४ (त ते न) आदी मुद्रित व पुनर्मुद्रित मिळून ५१ मौलिक पुस्तके प्रकाशित करून वाचकांना उपलब्ध करण्यात येणार आहेत.

नवलेखकांची १७ पुस्तके प्रकाशित होणार

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ‘नवलेखक अनुदान’ ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत ज्यांचे यापूर्वी एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा नवलेखकांचे काव्य, कथा, नाटक – एकांकिका, कादंबरी, ललितगद्य व बालवाङ््मय या वाङ््मय प्रकारातील पुस्तके अनुदानातून प्रकाशित केली जातात. या योजनेमध्ये यंदा ‘युद्ध पेटले आहे’ : लेखक बाळासाहेब नागरगोजे, ‘पेरणी’ : लेखक ज्ञानेश्वर गायके, ‘वेशीबाहेर’ : लेखक राजेश भांडे, ‘वैराण संघर्ष’ लेखक : अमोल सुपेकर, ‘इच्छा’ : लेखक भारती देव, ‘सुवास रातराणीचा’ : लेखक डॉ. यशवंत सुरोशे, ‘रानफुल’ : लेखिका रुपाली दळवी, ‘प्रतिशोध’ : लेखक निनाद चिंदरकर, ‘तिनसान आणि इतर तीन मालवणी एकांकिका’ : लेखक विठ्ठल सावंत, ‘भुईकळा’ : लेखक संदीप साठे, ‘अभंगसरिता’ : लेखक अजय चव्हाण, ‘मृत्युंजय’ : लेखक वासुदेव खोपडे, ‘डाल्याखालचं स्वातंत्र्य’ : लेखिका डॉ. मनीषा राऊत, ‘मित्रा…!’ : लेखक प्रवीण चांदोरे, ‘गावाकडच्या कथा’ : लेखक आर. आर. पठाण, ‘परिवर्तन’ : लेखक राजरत्न पेटकर आणि ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ : लेखक डॉ.नवनाथ वाव्हळ या नवलेखकांची एकूण १७ पुस्तके मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे प्रकाशित होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state literature and culture board releases 51 new books on marathi language pride day mumbai print news zws