मुंबई : उत्तर मुंबईतील मालाड परिसरात तब्बल १८ तलाव असून त्यापैकी दहा तलावांची स्वच्छता, गाळ उपसा करून ते पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. या तलावांचे येत्या दोन वर्षांत संवर्धन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. या आदेशानंतर मुंबई महापालिकेने या तलावांच्या सुशोभिकरणासाठी आराखडा तयार केला आहे. हे तलाव खासगी आणि सरकारी भागीदारी तत्त्वावर पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.
मुंबईतील सर्वात जास्त लोकसंख्येचा भाग म्हणून मालाड परिसर ओळखला जातो. मालाड परिसराचे वैशिष्ट्य म्हणचे तेथे तब्बल १८ तलाव असून या तलावांच्या सुशोभीकरणासाठी आता पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. हे तलाव राज्य सरकारच्या अखत्यारित असून गेल्या काही वर्षांत देखभालीअभावी या तलावांची दुरवस्था झाली आहे. या तलावांच्या ठिकाणी सोयी – सुविधा नसल्यामुळे नागरिकांना या परिसराचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे हे तलाव पालिकेकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली होती. त्यानुसार हे तलाव पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असून या तलावांमधील गाळ काढून त्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहेत. या तलावात भरणी करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत पुढील दोन वर्षांत त्यांचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्याची घोषणा गोयल यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती.
उत्तर मुंबईतील दहा तलावांची पाहणी करून त्यांची स्वच्छता, गाळ उपसा करून ते पुनरुज्जीवित करण्यात येतील, तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येत असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत दिली. हे काम खासगी आणि सरकारी भागीदारी तत्वावर केले जाणार असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेने या दहा तलावांचा अभ्यास केला असून त्याची माहिती नुकत्याच झालेल्या बैठकीत सादर केली होती. यामध्ये कारजाई तलाव, कमल तलाव, हरबादेवी तलाव, धारवली तलावाचा समावेश आहे. काही तलावांमध्ये पाणी असून त्याचा वापर गणेश विसर्जनासाठी केला जातो. मात्र तलावांतील पाण्याचा दर्जा अतिशय खालावला असून तलावामध्ये डासांची पैदास, दुर्गंधी अशा समस्या आहेत. त्यामुळे पाण्यामध्ये वायूविजन यंत्रणा, जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे, परिसरातील रहिवाशांचे प्रबोधन करणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे.
