ठाकुर्ली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गेल्या दोन दिवसात दोन जण लोकलमधून पडून मरण पावल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज सकाळी बदलापूर लोकलमधून पडून एक तरूण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बदलापूरहून सकाळी साडे सात वाजता सीएसटीकडे जाणारी लोकल विजय गायकवाड या तरूणाने पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजात ऊभा राहून प्रवास करीत होता. गर्दीच्या रेटय़ामुळे त्याचा हात सटकून तो खाली पडला. लोकलचा वेग कमी असल्याने त्याच्या जीवावर बेतले नाही. पण तो गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईला हलविण्यात आले, असे सुत्रांनी सांगितले.
कोपर येथे राहणारी सुनंदा सारंग ही वृध्द महिला दिवा रेल्वे स्थानक परिसरात लोकलमधून पडून मरण पावली. तर अशीच घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात घडून संदीप साळवी हा रेल्वे मार्ग ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत मरण पावला.