सांताक्रूझच्या शारदा बीअर बारमध्ये विजय पुजारी ऊर्फ बट्टा (३९) या इसमाची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी गोळ्या घालून आणि चाकूचे वार करून हत्या केली. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हे थरार नाटय़ घडले. पुजारीवर हल्ला करणारे पाचही आरोपी फरारी आहेत. मयत विजय आणि हल्लेखोर हे दोघेही स्थानिक गुंड आहेत.
विजय पुजारी ऊर्फ बट्टा हा सांताक्रूझच्या जवाहरनगर येथील शर्मा डेअरीजवळ राहतो. खासगी एअरलाइन्सच्या कार्गोमध्ये तो काम करतो. बुधवारी रात्री तो आपल्या चार मित्रांसह जवळच्या शारदा बीअर बारमध्ये गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास बारमध्ये आरोपी राहुल शर्मा हा आपले साथीदार मॅजिक, अजय पंडित, वीरेन ठाकूर, सुभाष शुक्ला यांच्यासह बारमध्ये घुसला. राहुलने आपल्याजवळील पिस्तुलातून विजय पुजारीच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेतील पुजारीवर राहुलच्या साथीदारांनी चॉपरने पंधरा-वीस वार केले. या वेळी पुजारीचा मित्र चंदनसिंगसुद्धा जखमी झाला. जखमी पुजारीला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. पुजारीला ठार मारण्याच्या उद्देशानेच हल्लेखोर आले होते असे पोलिसांनी सांगितले. विजय पुजारी आणि राहुल शर्मा यांचे पूर्ववैमनस्य होते. दोघेही सराईत गुंड असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हय़ांची नोंद असल्याची माहिती निर्मलनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली. घटनेनंतर राहुल शर्मा आणि त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुजारी याने शर्माला मारहाण केली होती. कालच पुजारी गावाहून परतला होता.