मुंबई : वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी पूल पाडण्यात येणार असून बेस्ट उपक्रमातील काही बसमार्ग खंडीत करण्यात आले आहेत. हे बसमार्ग खंडीत केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेतच पण बेस्टचे महसुली उत्पन्नही घटले आहे.
वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवीचा (एलफिन्स्टनचा) पूल पाडण्यास सुरूवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर हा पूल वाहतूकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. त्यामुळे दादर, प्रभादेवीपासून माहीम, वडाळा, शिवडी पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यातच या पुलाच्या कामामुळे अनेक बसमार्ग खंडीत करण्यात आले आहेत तर अनेक मार्ग वळवावे लागले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रभादेवी पुलावरून जाणारे बसमार्ग खंडीत झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उरले नाहीत. या प्रकरणी शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले आहे.
वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामामुळे प्रभादेवी पश्चिमेकडून परळ-शिवडी कडे येणारे बस क्र. ए-१६२, १६८ व २०१ हे मार्ग प्रभादेवी पर्यंतच सुरु आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या महसूलात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या तिनही मार्गावरील बेस्ट बसेसना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता व त्यामुळे बेस्ट प्रशासनास चांगला महसूल मिळत होता. या मार्गावर एकुण १७ बसगाड्या दररोज चालतात व एकंदर २०९ फेऱ्या सकाळी ५. ३० ते रात्री ११ पर्यंत होत असत व एकूण १३ हजार प्रवाशी प्रवास करतात.
अंदाजे एका महिन्यात साधारण ४,६५,००० प्रवासी प्रवास करतात. बहुतांश प्रवासी प्रभादेवी रेल्वे स्टेशन, दादर वरळी आदी भागात शॉपिंग करीता तसेच सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी मंदिर, स्वामी मठ आदी ठिकाणी देवदर्शनासाठी जात असतात. तसेच शारदा श्रम, बालमोहन, अँटोनिया डिसिल्वा या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच वरळी प्रभादेवी परिसरातून वडाळा येथे जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.
ए-१६२, १६८ व २०१ हे बसमार्ग बंद झाल्यामुळे दादर (प.) येथे जाणाऱ्या अनेक विद्यार्थी तसेच नागरिकांना सध्या शिवडी बस डेपोतून दादर पश्चिमेस जाणारी बस क्र. ४० ही एकमेव बस आहे. वरील तीनही बसने जाणारे प्रवासी बस क्र. ४० ने वीर कोतवाल उद्यानापर्यंत प्रवास करुन पुढील प्रवास अन्य बसने करीत आहेत.
तरी प्रवाशांच्या सोयीसाठी दादर पश्चिमेहुन जाणाऱ्या बस क्र. ५२, ८८, ११०, ए३५७, २०१, ए६३, सी ३०५ या बसेसना वीर कोतवाल उद्यानजवळ जाता येईल, अशा रितीने वेळापत्रकाची आखणी करावी व प्रवाशांच्या सोयीसाठी बस क्र. ४० ची वारंवारता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात यावी व त्या वेळेवर सोडण्यात याव्यात, जेणेकरुन अँटोनिया डिसिल्वा, शारदाश्रम हायस्कूल व प्रभादेवीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
एमएमआरडीएने नुकसान भरपाई द्यावी …. हे बसमार्ग बंद केल्यामुळे बेस्ट प्रशासनाचे महिन्याकाठी लाखो रुपये तसेच वर्षाकाठी करोड रुपयाचे नुकसान होणार आहे. अगोदरच डबघाईला आलेले बेस्ट प्रशासन या आर्थिक तुटीमुळे अजूनच संकटात जाण्याची शक्यता आहे. कामगारांची देणी देखील देण्यास बेस्ट प्रशासनाकडे निधी नाही, अशी दयनीय अवस्था आहे.
या प्रकल्पामुळे बाधित होणारे निवासी, अनिवासी गाळेधारक. मंदिर, मस्जिद आदींच्या पुर्ननिर्माणाकरीता एमएमआरडीए प्रशासनाने ठोस आर्थिक स्वरुपात भरपाई केली आहे. त्याच धरतीवर बेस्ट प्रशासनाचे होणारे नुकसान टाळण्याकरीता एमएमआरडीएने बेस्ट प्रशासनास ठोस आर्थिक मदत करावी, अशी मागणी पडवळ यांनी एमएमआरडी प्रशासनाला पत्र लिहून केली आहे.